बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातील ६ जागा लढवणार, कोअर कमिटीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 15:18 IST2024-10-15T15:15:40+5:302024-10-15T15:18:21+5:30
या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी वसईमधून निवडणूक लढवावी असा आग्रह कोअर कमिटीतील पदाधिकारी यांनी केला आहे.

बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातील ६ जागा लढवणार, कोअर कमिटीत निर्णय
- मंगेश कराळे
नालासोपारा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजणार असल्याने लक्षात घेऊन मंगळवारी बहुजन विकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक विरार येथे पार पडली. या बैठकीत पालघर जिल्ह्यातील सहा जागांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील सहाच्या सहा जागा लढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्याचसोबत या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी वसईमधून निवडणूक लढवावी असा आग्रह कोअर कमिटीतील पदाधिकारी यांनी केला आहे.
सर्वच पक्षांनी निवडणूकीची तयारी सुरू केली असून पालघर जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. मंगळवारी पालघर जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये पालघर जिल्ह्यातील सहा जागाचा आढावा घेण्यात आला. बहुजन विकास आघाडी जिल्ह्यातील सहाच्या सहा जागा स्वबळावर लढणार असल्याचे माजी महापौर नारायण मानकर यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजेश पाटील, जेष्ठ नेते मुकेश सावे , माजी उपमहापौर उमेश नाईक, माजी महापौर रुपेश जाधव, अजय खोकाणी, जितूभाई शहा, माजी खासदार बळीराम जाधव, माजी सभापती प्रफुल साने, पंकज ठाकूर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नारायण मानकर यांनी सांगितले की, ही पहिली सभा पालघर जिल्ह्यासाठी झाली असून या पुढील बैठका राज्यातील कोकण, सोलापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे मुंबई, मराठवाडा आदी भागांतील कोअर कमिटीतील पदाधिकारी व कार्यकर्तेशी बोलून होणार आहे.
दरम्यान, बविआ राज्यात जवळपास ५० विधानसभेच्या जागा लढणार आहे. यावेळी पत्रकारांनी बविआचे जेष्ठ नेते व कार्याध्यक्ष राजीव पाटील यांच्या भाजप प्रवेशा बाबतीतला प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी स्पष्ट केले की, याबाबत अद्याप पक्षापर्यंत कुठलीही अधिकृतपणे माहिती आलेली नाही. त्यामुळे जर तरच्या गोष्टीवर उत्तर देणे सयुक्तिक ठरणार नाही त्यानिमित्ताने या विषयावर अधिक चर्चा झाली नाही.