आयुष्यमान कार्डधारक रुग्णांची गुजरातमध्ये फरफट, तरुणाने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 09:20 AM2023-02-13T09:20:42+5:302023-02-13T09:21:13+5:30

कार्ड असूनही उपचाराअभावी तरुणाने गमावला जीव

Ayushman card holder's blunder in Gujarat, youth lost his life | आयुष्यमान कार्डधारक रुग्णांची गुजरातमध्ये फरफट, तरुणाने गमावला जीव

आयुष्यमान कार्डधारक रुग्णांची गुजरातमध्ये फरफट, तरुणाने गमावला जीव

googlenewsNext

सुरेश काटे

तलासरी : गुजरातमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णाचे हॉस्पिटलचे बिल राज्य सरकार देत नसल्याने गुजरातमधील रुग्णालये महाराष्ट्रातील रुग्णावर उपचार करण्यास नकार देत असल्याने आयुष्यमान कार्ड असूनही उपचाराअभावी आदिवासींचे मृत्यू होत असताना सरकार मात्र साखरझोपेत असल्याचा आरोप केला जात आहे. 

तलासरी तालुक्यातील झरी येथील आदिवासी तरुण प्रशांत लखमा ठाकरे (४५) याला शनिवारी संध्याकाळी हृदयविकाराचा  झटका आला. त्याला वापी येथील हरिया रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारासाठी आयुष्यमान भारतचे कार्ड दाखविण्यात आले, पण हरिया रुग्णालयाच्या प्रशासनाने  कार्ड स्वीकारण्यास मनाई करून  उपचारासाठी रोख रक्कम भरण्यास सांगितले. प्रशांतच्या नातेवाईकांनी पैशांची तजवीज करतो असे सांगून उपचार सुरू करा असे सांगितले, परंतु त्याचे उपचार सुरू असतानाच रात्री त्याचा मृत्यू झाला. 
आयुष्यमान भारतचे कार्ड असताना जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यास नकार दिल्याने व उपचारास उशीर केल्याने प्रशांतचा मृत्यू झाला. या वेळी प्रशांतच्या उपचाराचे १ लाख ८९ हजार ९८८ रुपयांचे बिल नातेवाईकांच्या हाती ठेवले. नातेवाइकांनी उधारी घेऊन  बिल भरून रविवारी सकाळी मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत रुग्णालयाकडे विचारणा केली असता राज्य सरकारकडून या योजनेचा उपचाराचा निधी मिळत नसल्याचे तेथील रुग्णालयांचे म्हणणे आहे.

पालघर जिल्ह्यात आरोग्यसेवेचा बोजवारा
तलासरी भागातील तसेच पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून रुग्णालयात उपचाराची वानवा असल्याने या भागातील आदिवासी रुग्ण गुजरात आणि सिल्व्हासा येथील रुग्णालयात उपचारासाठी प्राधान्य देतात.  यातील बहुतांश रुग्ण हे पंतप्रधान जन आरोग्य योजनेतील लाभार्थी असतात, मात्र गुजरातमधील रुग्णालये महाराष्ट्रातील रुग्णांना या आरोग्य योजनेचा लाभ देण्यास नकार देतात.

Web Title: Ayushman card holder's blunder in Gujarat, youth lost his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.