खेळाच्या मैदानाच्या जागेवर बांधले चक्क ९ अनधिकृत बंगले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 00:23 IST2019-07-14T00:23:22+5:302019-07-14T00:23:30+5:30
वसई - विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जमीन हडप करून चक्क ९ अनधिकृत बंगले बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

खेळाच्या मैदानाच्या जागेवर बांधले चक्क ९ अनधिकृत बंगले
नालासोपारा : अनधिकृत बांधकामामुळे गालबोट लागलेल्या वसई - विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जमीन हडप करून चक्क ९ अनधिकृत बंगले बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी विरार पोलीस ठाण्यात गुरुवारी या बंगल्याच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विरार पूर्वेकडील फुलपाडा रोडवरील मौजे विरार, सर्व्हे नंबर १२८ मधील हिस्सा नंबर १, सर्व्हे नंबर ९३ मधील हिस्सा नंबर ९, १०, ११, १२ ही जमीन शासनाने मैदानासाठी राखीव ठेवली आहे. असे असूनही २७ आॅगस्ट २०१८ पूर्वी ९ अनधिकृत बंगले वसई विरार महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता बिनधास्तपणे शासनाची फसवणूक करून बांधण्यात आले होते. येथे राहणारे प्रकाश पाटील, अजय पाटील, विजय पाटील, उल्हास पाटील, राजेन्द्र पाटील, मितेश पाटील, अरुणा पाटील, अमोल पाटील आणि देवेन्द्र पाटील यांच्याविरोधात ‘सी’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद चव्हाण यांनी गुरुवारी विरार पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यात सरकारी जमिनीवर कब्जा करून बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे बांधून ग्राहकांना विकली जात आहे. महानगरपालिका या अनधिकृत बांधकामावर कारवाई करत नसल्याने सामान्यांची फसवणूक होत आहे. हे ९ बंगले एकाच दिवशी बांधलेले नाहीत. मग बंगले बांधले त्यावेळी अधिकारी आणि नगररचना विभागातील अधिकारी काय करत होते, असा सवाल नागरिक करत आहेत.
>अनधिकृत आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधण्यात येणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे. आतापर्यंत २३ लोकांवर एमआरटीपी, २ बनावट सीसी आणि विरार पोलीस ठाण्यात ११ लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
- प्रमोद चव्हाण (प्रभाग सी, सहाय्यक आयुक्त)
>अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई होत असून यापुढेही होत राहील.
- बळीराम पवार, आयुक्त,
वसई विरार महानगरपालिका