आरिफ शेख खुनातील चौघांना कोठडी; पोलिसांनी घेतली न्यायवैज्ञानिक तज्ञांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:31 IST2019-05-16T00:31:44+5:302019-05-16T00:31:56+5:30
येथील अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली शेख यांचे शव जाळल्यानंतर उरलेली पुरावे पोलिसांना बिरवाडी येथील एका अर्धवट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये आढळून आले आहे.

आरिफ शेख खुनातील चौघांना कोठडी; पोलिसांनी घेतली न्यायवैज्ञानिक तज्ञांची मदत
पालघर : येथील अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली शेख यांचे शव जाळल्यानंतर उरलेली पुरावे पोलिसांना बिरवाडी येथील एका अर्धवट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये आढळून आले आहे. तसेच या प्रकरणात पालघर पोलिसांनी स्मिता शेट्टी या महिलेलाही अटक केली आहे. आरिफ शेख यांच्या अपहरण व खून प्रकरणी आतापर्यंत स्मिता शेट्टीसह चार आरोपी पोलिसांनी पकडले आहेत. आज मंगळवारी या चारही आरोपींना पालघर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश घाडगे यांनी चारही आरोपींना २२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
व्यावसायिक वादातून आरोपी प्रशांत संखे या मुख्य सूत्रधाराने नामदेव संखे, प्रशांत महाजन यांच्या संगनमताने आरिफ मोहम्मद अली शेख यांना नऊ मे रोजी अपहरण केले होते. त्यानंतर आपल्या वाहनांमध्ये त्यांनी आरिफ यांचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने या आरोपींनी आरिफ याचा मृतदेह बिरवाडी येथे अंगावर ज्वलनशील द्रव टाकून जाळला. त्यानंतर उरलेले पुरावे व त्यांची हाडे या आरोपींनी तिथे असलेल्या एका अर्धवट बांधकाम असलेल्या टाकीत टाकून दिले. हे पुरावे पोलिसांना हाती लागले असून याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत. यासाठी पोलिसांनी न्यायवैज्ञानिक तज्ञांची मदत घेतली आहे ज्या ठिकाणी आरिफ यांना जाळले होते त्या ठिकाणी त्यांच्या सदनिकांची चावीही पोलिसांना आढळून आलेली आहे. आतापर्यंत पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेले स्कॉर्पिओ वाहन व चार आरोपी अटक केली असून विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात आणखी तीन ते चार आरोपी असल्याची शक्यता आहे.
आरोपी शिवा ठाकूर याची गळफास लावून आत्महत्या
आरिफ शेख याचा खून झाल्यानंतर त्याचा मृतदेह जाळून टाकीत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रमुख भूमिका बजावणाऱ्या शिवा चंद्रकांत ठाकूर (३५) रा. बिरवाडी या आरोपीने बुधवारी शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ंआरिफ शेख या उद्योगपतीच्या अपहरणचा डाव हा नियोजित असल्याचे समोर येत असून या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत संखे यांनी अनेक दिवसांपासून या अपहरण नाट्याची तयारी केली होती.
अपहरणासाठी टेम्भोडे येथील चार मुलांना आमिषे दाखवित संखे यांनी त्यांना तयार केल्याची माहिती पोलिसांकडे आल्या नंतर पोलिसांनी या प्रकरणात चार मुलांना ताब्यात घेतले आहे. शेख यांचे अपहरण केल्या नंतर त्याने आपल्या बचावासाठी केलेले जोरदार ओरडून केलेले प्रयत्न आरोपीनी अयशस्वी करीत त्याचे नाक-तोंड दाबून त्याला ठार मारले. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी प्रशांत संखे यांनी बिरवाडी येथील शिवा ठाकूर याची मदत घेतली होती.