वीज खंडित झाल्याने सूर्याच्या नवीन जलवाहिनीचा "एअर वॉल" नादुरुस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 13:52 IST2020-11-15T13:42:49+5:302020-11-15T13:52:14+5:30
Vasai Virar : नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महापालिकेस सहकार्य करावे असे ही आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलं आहे.

वीज खंडित झाल्याने सूर्याच्या नवीन जलवाहिनीचा "एअर वॉल" नादुरुस्त!
आशिष राणे
वसई :- वसई विरार शहर महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवन पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट येथे रविवार दि.15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.15 वाजता महावितरण कं.ची वीज अचानकपणे खंडित (ट्रीपिंग) झाल्यानं सूर्या धरणाच्या नवीन योजनेवरील धुकटन गावाजवळ बॅक प्रेशरने एअर वाँल नादुरुस्त होऊन पाण्याचे उंचच उंच फवारे उडाल्याची घटना एन दिवाळी सणाच्या वेळीच घडली आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने माहिती मिळताच मासवन व धुकटंन त्याठिकाणी धाव घेत त्या एअर वॉलच्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सकाळपासूनच सुरू केल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान धुकटंन येथे सुरू असलेल्या या दुरुस्ती कामासाठी अंदाजे चार ते पाच तास लागणार असल्याने सूर्या धरणाच्या नवीन योजनेतून होणारा पाणी पुरवठा रविवारी पूर्ण पणे बंद राहणार असल्याचे ही पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केलं आहे.
विशेष म्हणजे सूर्या धरणाच्या जुन्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा व त्याचा विद्युत पुरवठा रविवारी सकाळीच अचानकपणे ट्रीपिंग झाल्यामूळे सकाळच्या वेळी येथील पाणीपुरवठा काही काळ बंद झाला होता. त्यामुळे रविवारी वसई विरार शहरात होणारा पाणी पुरवठा अनियमित-कमी दाबाने व काही प्रमाणात होईल त्यानुसार नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महापालिकेस सहकार्य करावे असे ही आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलं आहे.