पालघर-खर्डी रेल्वेसाठी जानेवारीत होणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:29 IST2019-11-16T23:29:40+5:302019-11-16T23:29:50+5:30
संघर्ष समितीच्या बैठकीत ठराव; नोकरदार, विद्यार्थ्यांसाठी लाभदायक

पालघर-खर्डी रेल्वेसाठी जानेवारीत होणार आंदोलन
विक्रमगड : पालघर स्टेशन तसेच मध्य रेल्वेवरील खर्डी स्टेशन जोडले गेल्यास नव्याने निर्माण झालेला पालघर व नाशिक जिल्हा जोडला जाऊ शकेल. येथील नागरिकांना दळणवळणाचे एक नवे महत्त्वाचे व अतिशय स्वस्त असे पर्यायी साधन उपलब्द्ध होऊन त्याचा लाभ विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच पर्यटकांना होईल असे संघर्ष समितीच्या अभ्यास गटाने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे.
पालघर स्टेशन ते खर्डी स्टेशन हे अंतर सुमारे ८० किलोमीटरचे असून हा रेल्वेमार्ग कमी खर्चात व कमी वेळेत पूर्ण होऊ शकेल. या मार्गावरून गुजरात व नाशिककडे जाणारी थेट रेल्वेसेवा सुरू केल्यास मुंबईच्या रेल्वे सेवेवरील ताणही कमी होण्यास मदत होईल अशी माहिती पालघर-खर्डी रेल्वे संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन शेलार यांनी दिली. यासाठी पालघर-खर्डी रेल्वे संघर्ष समितीच्या बैठकीत तसा ठराव घेण्यात आला असून ही समिती जानेवारीमध्ये मोठे आंदोलन करून लवकरच रेल्वे परिषद घेणार असल्याचेही शेलार यांनी सांगितले.
हा रेल्वे मार्ग विद्यार्थी, तरूण, शेतकऱ्यांना रोजगाराची संधी देणारा तसेच विक्रमगड-वाडा-पालघर येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना व उद्योगव्यवसायांना नवी संजीवनी प्राप्त करून चालना देणारा ठरेल. त्यामुळे या अतिदुर्गम भागाचा विकास झपाट्याने होऊन नागरिकांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल झालेला आपल्याला काही वर्षातच पाहायला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
हा रेल्वेमार्ग या भागाचा सर्वांगिण विकास साधणारा असल्याने अत्यंत महत्त्वाचा असा आहे. रेल्वेमार्ग प्रशासनाने मंजूर करून जलदगतीने पूर्ण करावा, अशी विनंती संघर्ष समितीकडून केली आहे. येथे उत्पादित केल्या जाणाºया शेतमालाला जवळची मोठी बाजारपेठ नसल्याने शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेती करणेही आर्थिकदृष्ट्या न परवडणारी झाल्यामुळे नागरिकांचा शेतजमिनी विकण्याकडे कल वाढत चालला आहे. हा मार्ग झाल्यास या परिसराचा निश्चितच विकास होईल अशी माहिती शेलार यांनी दिली.
सुविधांअभावी उद्योगांवर गंडांतर
या भागात मूलभूत सुविधा पुरविण्यात सरकारला अपयश आल्याने अभियंते, कुशल कामगार या भागात नोकरीसाठी येण्याचे टाळतात. त्यामुळे येथील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून येथील बेरोजगारीत आणखीनच भर पडणार आहे.