काशीमीरा येथील ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नाच व चाळे करणाऱ्या ९ जणांना पकडले
By धीरज परब | Updated: January 30, 2023 19:39 IST2023-01-30T19:38:30+5:302023-01-30T19:39:09+5:30
काशीमीरा येथील ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नाच व चाळे करणाऱ्या ९ जणांना पकडण्यात आले.

काशीमीरा येथील ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नाच व चाळे करणाऱ्या ९ जणांना पकडले
मीरारोड : काशीमीरा पोलिसांनी पेणकरपाड्याकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मेमसाब ऑर्केस्ट्रा बार मध्ये बेकायदा चालणाऱ्या अश्लील नाच व अश्लील हावभाव प्रकरणी धाड टाकून नाच करणाऱ्या बारबाला, बार कर्मचारी ,व ग्राहक अश्या ९ जणांना पकडले. पोलिसांनी चालक-मालक मिळून एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मेमसाब ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला गायिकांच्या आड तोकड्या कपड्यात बारबाला अश्लील अंगविक्षेप व हावभाव करून अश्लील नाच करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या निर्देशा नुसार उपनिरीक्षक अर्चना जाधव व हर्षल राऊत सह सिसोदिया, खंदारे, अक्षय पाटील आदींच्या पथकाने मेमसाब ऑर्केस्ट्रा बार वर मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकली.
३ बारबाला तोकड्या कपड्यात अश्लील हावभाव करत नाचत होत्या . पोलिसांनी त्यांच्या सह ३ ग्राहक, बारचे कर्मचारी ह्यांना ताब्यात घेतले. बारचा मालक अब्दुल करीम शेख सह एकूण ११ जणांवर २८ जानेवारी रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बार मधून पोलिसांना १२ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. शहरातील ऑर्केस्ट्रा बार मध्ये बेकायदा अश्लील नाच व गैरप्रकार चालत असल्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत.