बोईसरचा ५०० मीटर परिसर झाला सील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 02:04 AM2020-04-28T02:04:28+5:302020-04-28T02:04:36+5:30

तीन डॉक्टर आणि ४ कर्मचाऱ्यांना ‘होम क्वारंटाइन’ करून ५०० मीटरचा परिसर १४ दिवसांसाठी सील केला आहे. या संपूर्ण भागाचे सर्वेक्षण होणार आहे.

The 500 meter area of Boisar was sealed | बोईसरचा ५०० मीटर परिसर झाला सील

बोईसरचा ५०० मीटर परिसर झाला सील

Next

बोईसर : बोईसर येथील ३४ वर्षीय रुग्णाला ‘सारी’ची लक्षणे असल्याने त्याची कोरोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला. यामुळे त्याचे जवळचे नातेवाईक व संपर्कात आलेल्या दहा जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. सोमवारी या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर तीन डॉक्टर आणि ४ कर्मचाऱ्यांना ‘होम क्वारंटाइन’ करून ५०० मीटरचा परिसर १४ दिवसांसाठी सील केला आहे. या संपूर्ण भागाचे सर्वेक्षण होणार आहे.
या रुग्णाचा मुंबई प्रवासाचा इतिहास असून त्याला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या संपर्कातील १० जणांचे रविवारी रात्री उशिरा माहीम रोड येथे विलगीकरण केले आहे. सोमवारी पालघरचे उपविभागीय अधिकारी तोरस्कर, तहसीलदार सुनील शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे, पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे इत्यादी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
बोईसर-तारापूर या मुख्य रस्त्यावरील सिडको बायपासपासून चित्रालय येथील पोलीस चौकीपर्यंतचा संपूर्ण भाग सील केला आहे. दलाल टॉवर, सिडको कॉलनी, भीमनागर, स्वरूप नगर, रूपरजत नगर, भय्या पाडा, दत्तवाडी, पीडीनगर, कोंबडी गल्ली, शांती नगर, पुष्कर पार्क, सोलंकी कॉम्प्लेक्स या भागांचा यात समावेश आहे. भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तू बोईसर ग्रामपंचायतीच्या ‘जीपी बोईसर’ या अ‍ॅपवर आॅर्डर दिल्यास घरपोच मिळण्याची व्यवस्था केली आहे.
>नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. प्रशासनाला मदत करावी. प्रशासन आपले काम करीत आहे. सर्वांनी घरीच थांबून आरोग्य टीमला सहकार्य करावे. कोरोनासदृश काही लक्षणे असल्यास त्वरित आरोग्य विभागाला किंवा सिडको येथे स्थापन केलेल्या कंट्रोल रूमला कळवावे.
- डॉ. अभिजित खंदारे, तालुका वैद्यकीय अधिकारी, पालघर तालुका.

Web Title: The 500 meter area of Boisar was sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.