विरार रेल्वे स्टेशनवरून ४ वर्षाच्या मुलाला पळवलं; पोलिसांनी काही तासांत केली आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2023 16:13 IST2023-05-30T16:13:09+5:302023-05-30T16:13:19+5:30
आरोपी शमशाद मन्सूरी हा पाच दिवसांपूर्वीच बिहार राज्यातील मुजफ्फरनगर येथून मुंबईत आला होता.

विरार रेल्वे स्टेशनवरून ४ वर्षाच्या मुलाला पळवलं; पोलिसांनी काही तासांत केली आरोपीला अटक
मंगेश कराळे
नालासोपारा :- विरार रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनमधून चार वर्षीय मुलाला पळवून नेणाऱ्या आरोपीला वसई लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आईचा डोळा लागल्यानंतर चोरट्याने मुलाला पळवून नेले होते. तक्रारीनंतर सीसीटीव्हीमुळे या संपूर्ण घटनेचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रविवारी चार वाजल्याच्या सुमारास चार वर्षीय मुलगा व त्याची आई रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहत बसले होते. यावेळी आईचा अचानक डोळा लागला व या गोष्टीचा फायदा घेत आरोपी शमशाद मानसुरी (२१) चालत्या लोकलचा फायदा घेत मुलाचे अपहरण केले. या धक्कादायक प्रकारानंतर महिलेने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपासकार्यास सुरूवात केली. यावेळी रेल्वे स्थानकावर असलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता आरोपीचा शोध लागला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून अटक करत लहान मुलाला आईच्या ताब्यात दिले. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून आरोपीने अजून काही गुन्हे केले आहेत का? याचा वसई लोहमार्ग पोलिस तपास करत आहेत.
आरोपी शमशाद मन्सूरी हा पाच दिवसांपूर्वीच बिहार राज्यातील मुजफ्फरनगर येथून मुंबईत आला होता. तो नेमका अपहरण केलेल्या मुलाचे काय करणार होता. याचा तपास आम्ही करत असल्याची माहिती वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी दिली आहे.