"मीरा भाईंदरच्या विकासासाठी ३ हजार कोटींचा निधी; भूमीपूजन, लोकार्पणासाठी उपस्थित राहणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री"
By धीरज परब | Updated: June 27, 2023 19:01 IST2023-06-27T19:00:53+5:302023-06-27T19:01:47+5:30
मंगळवारी महापालिका पत्रकार कक्षात आ. सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

"मीरा भाईंदरच्या विकासासाठी ३ हजार कोटींचा निधी; भूमीपूजन, लोकार्पणासाठी उपस्थित राहणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री"
मीरारोड - मीरा भाईंदर शहराच्या विविध विकासकामांसाठी राज्य सरकार, एमएमआरडीएकडून जवळपास ३ हजार कोटींचा निधी मंजूर करून आणला असून शहराच्या इतिहासात आतापर्यंत इतका निधी पहिल्यांदाच मिळाला, असे सांगत आमदार प्रताप सरनाईक यांनी विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पणासाठी २ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बालयोगी सदानंद बाबा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवारी महापालिका पत्रकार कक्षात आ. सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांच्या सोबत आमदार गीता जैन , शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर , विक्रमप्रताप सिंह, भाजप जिल्हाध्यक्ष रवि व्यास, शरद पाटील आदि उपस्थित होते.
राज्यात शिवसेना भाजप युतीचे शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी मीरा भाईंदर शहरासाठी आपल्या मागणी नुसार भरभरून विकास निधी दिला आहे. जवळपास ३ हजार कोटींपेक्षा जास्त निधी विकास कामांवर खर्च होणार आहे.
एमएमआरडीए , राज्य सरकार, केंद्र सरकारने शहराच्या विकासासाठी निधी दिला आहे. जवळपास २ हजार कोटींचा निधी खर्च करून शहरातील सर्व रस्ते काँक्रीटचे केले जाणार आहेत. सूर्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी वितरित करण्यासाठी वितरण व्यवस्था उभारण्या करता ५१६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
मीरा भाईंदर मध्ये पायाभूत सुविधा देतानाच मेट्रो, पिण्याच्या पाण्याची योजना , विविध समाज भवने आदी विकास कामे होत आहेत. मीरा भाईंदर शहराला विकासाच्या बाबतीत मॉडेल सिटी बनविण्याचा प्रयत्न आहे. सिव्हरेज प्रकल्प, उद्याने व तलाव आणि स्मशान भूमी विकास अशी अनेक कामे होणार आहेत.
भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुल शहरात उभारले जाणार असून त्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते २ जुलै रोजी होणार आहे. तसेच गेल्या १ वर्षात राज्य सरकार कडून अनेक विकासकामां साठी विशेष निधी मंजूर करून आणला असून त्यातील काही कामांचा आरंभ सुद्धा केला जाणार आहे असेह आ. सरनाईक यांनी सांगितले.
आरक्षण क्रमांक २४८ बगीचा या आरक्षित जागेत सद्गुरू सदानंद महाराज सभागृह बांधण्याचे काम शासनाने मंजूर केले आहे. त्यासाठी विशेष निधीतून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या सभागृहात एक ग्रंथालय सुद्धा असेल. त्याचे भूमिपूजन सुद्धा २ जुलै रोजी केले जाणार असून सदानंद बाबा उपस्थित राहणार असल्याची माहिती आ. सरनाईक यांनी दिली.