२२० कोटींचा कर्मचारी घोटाळा?

By Admin | Updated: March 31, 2016 02:45 IST2016-03-31T02:45:37+5:302016-03-31T02:45:37+5:30

वसई-विरार महापालिकेत गेल्या पाच वर्षांत ठेका कर्मचारी भरतीत तब्बल २२० कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती माहिती अधिकारातून मिळालेल्या तपशिलाच्या आधारे उघड झाली आहे.

220 crore employees scam? | २२० कोटींचा कर्मचारी घोटाळा?

२२० कोटींचा कर्मचारी घोटाळा?

- शशी करपे,  वसई

वसई-विरार महापालिकेत गेल्या पाच वर्षांत ठेका कर्मचारी भरतीत तब्बल २२० कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती माहिती अधिकारातून मिळालेल्या तपशिलाच्या आधारे उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या २ हजार ८४४ कर्मचाऱ्यांचा कोणताही तपशिल महापालिकेकडे नसल्याची माहिती महापालिकेनेच दिली आहे.
हा खर्च झालाच नसून ही ठेकेदारांमार्फत अधिकाऱ्यांच्या संगनमताने केलेली लूट आल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. ठेकेदारांनी पुरवलेल्या कर्मचाऱ्यांची फक्त संख्या देवून पालिकेकडून बिले वसुल केली गेली. मात्र, त्यांची नावे सविस्तर तपशिल पालिकेला दिला गेलाच नाही आणि पालिकेनेही तो कधी मागितला नाही. त्यामुळे तो पालिकेकडे उपलब्ध नाही असे जन माहिती अधिकारी सौंदर्या संखे यांनी नंदकुमार महाजन यांना कळवले आहे.
वसई-विरार महापालिकेच्या पूर्वीच्या पाच प्रभाग समित्यांसाठी २२ ठेकेदारांकडून ३३७१ विविध कर्मचारी नेमण्यात आले होते. कर्मचाऱ्यांची ही संख्या मंजूर आकृतीबंधापेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आल्यावर आयुक्त सतीश लोखंडे यांनी एक समिती नेमून १ फेब्रुवारीपासून २ हजार ८४४ कर्मचारी कमी केले. त्यामुळे वर्षाकाठी पालिकेच्या ४४ कोटी रुपयांची बचत झाली. त्यामुळे अनावश्यक कर्मचारी भरती करून ठेकेदारांनी पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचे निष्पन्न झाले. कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे एका वर्षात ४४ कोटी रुपयांप्रमाणे गेल्या पाच वर्षात २२० कोटी रुपयांची लूट या ठेकेदारांनी केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
त्यापैकी युनिवर्सल एंटरप्रायजेसने ११०, क्लासिकने १०० आणि दिव्या एंटरप्रायजेसने ९४ असे मिळून ३०४ संगणक चालक महापालिकेला पुरवले होते. महापालिकेच्या पाच प्रभागात तीनशेहून अधिक संगणक आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. या तीन ठेकेदारांनी संगणक चालकासह लिपीक मिळून ६४७ कर्मचारी पुरवले होते. त्यात आता कपात करून फक्त २०५ कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या तीन ठेकेदारांनी आतापर्यंत ४४२ कर्मचाऱ्यांचा दैनंदिन पगार महापालिकेकडून नाहक वसूल केल्याचे स्पष्ट झाले आहे.
युनीव्हर्सलने यापूर्वी पुरवलेले ३ ग्रंथपाल, १६ वाहने ३ समूह संघटक, ६ मदतनीस, सर्वेक्षणासाठीचे ३ आणि ५१ पैकी ४९ तारतंत्री पालिकेने कपात केले आहे. तर दिव्या एंटरप्रायजेसने पुरवलेले सर्व ८१ अभियांत्रिकी कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. आकाश एंटरप्रायजेसने पुरवलेले २ ग्रंथपाल, ३० तारतंत्री, १० सहाय्यक तारतंत्री, ११ समूह संघटक आणि मदतनीस, गजानन एंटरप्रायजेसने दिलेल्या ६ अंगणवाडी शिक्षिका आणि १५ मनष्यबळ, १७ समूह संघटक आणि मदतनीस, जीवदानीचे १३ वाहने, ३४ फायरमन, ३० चालक महापालिकेने कमी केले. त्यामुळे या कपात केलेल्या कर्मचाऱ्यांची आणि वाहनांची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अस्तित्वात नसलेल्या पूर्ण आणि असलेल्यांचा निम्मा पगार या भ्रष्टाचाऱ्यांनी हडप करून महापालिकेला करोडोचा चूना लावला आहे, अशी चर्चा आहे.
धक्कादायक बाब म्हणजे यातील एक बडा ठेकेदार पालिकेत अधिकारी असून सध्या अनधिकृत बांधकामप्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले आहे. तर दुसरा बडा ठेकेदार पालिकेत अनेक वर्षे ठेका पद्धतीवर इंजिनियर म्हणून कार्यरत होता. त्यालाही आयुक्त सतीश लोखंडे यांनी गेल्या महिन्यात घरचा रस्ता दाखवला. तर काही ठेकेदार सत्ताधाऱ्यांशी संंबंधित आहेत. या ठेकेदारांनी ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना खूपच कमी पगार दिल्याचेही आता उजेडात आले आहे.
कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात पगार जमा केल्यानंतर त्यातील निम्याहून अधिक रक्कम ठेकेदार पुन्हा घेत असल्याचे ठेका पद्धतीवर काम करणारे कर्मचारी सांगत आहेत. आयुक्त लोखंडे यांनी २ हजार ८४४ कर्मचाऱ्यांना कमी करून ठेकेदारांची मक्तेदारी मोडित काढली असली तरी गेल्या पाच वर्षात यात झालेल्या घोटाळ्याकडे मात्र कानाडोळा केला असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.

ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती संबंधित विभाग प्रमुखांकडे असते. तसेच कर्मचाऱ्यांना ठेकेदारामार्फत पगार दिला जात असल्याने त्याची माहिती पालिका ठेवत नाही.
- अजीज शेख, उपायुक्त

Web Title: 220 crore employees scam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.