जव्हारला गॅस्ट्रोचे २ बळी; १४ जणांवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 09:39 IST2025-07-18T09:39:44+5:302025-07-18T09:39:55+5:30
दूषित पाण्याने साथरोगाचे थैमान; ग्रामस्थ भयभीत

जव्हारला गॅस्ट्रोचे २ बळी; १४ जणांवर उपचार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : तालुक्यातील राजेवाडी पाड्यात गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले असून चिंतू गोंड (वय ५५), अनिता गांगड (४५) या दोघांचा मृत्यू झाला आहे. येथे आणखी १४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. या साथीच्या लक्षणांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जव्हारपासून २० कि.मी.च्या अंतरावर नांदगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत राजेवाडी पाडा आहे. दोन दिवसांपासून उलटी-जुलाबाचा त्रास होत असल्याने येथील अनेक ग्रामस्थ जव्हार कुटिर रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव येथे दाखल झाले आहेत. उपचारादरम्यान एकाचा जव्हार रुग्णालयात तर एकाचा राहत्या घरी मृत्यू झाला आहे. अनेक वर्षांपासून राजेवाडी पाड्यात पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, अद्याप ते काम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांना विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. पाऊस, अस्वच्छता, उताराच्या मार्गाने वाहत जाणारे नाल्याचे पाणी त्यामुळे विहिरीतील पाणी दूषित झाले असून त्यातूनच ही साथ पसरल्याचे बोलले जात आहे.
आदिवासींचे जीव स्वस्त झालेत काय?
जव्हार मोखाडासारख्या दुर्गम भागातील गावपाडे आजही विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असून, येथे पावसाळ्यात साथीच्या रोगांची दाट शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व तयारी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे. अशा मृत्यूच्या घटनांमुळे आदिवासींचे जीव स्वस्त झाले काय? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
दोन वर्षांपासून जलजीवन योजनेचे काम चालू आहे, ते पूर्ण झालेले नाही. अन्यथा आज नळाला शुद्ध पाणी मिळाले असते. असे असताना विहिरींची साफसफाई होत नसल्याने साथरोग पसरून दूषित पाण्यामुळे गावातील दोघांना जीव गमवावा लागला आहे.
संजय भले, ग्रामस्थ, राजेवाडी
आम्ही दोन दिवसांपासून गावात सर्व्हे करीत आहोत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली आहे. दोन गॅस्ट्रो संशयित रुग्ण दगावले आहेत. बाकी रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तालुका आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय यावर योग्य त्या उपाययोजना करत आहेत.
डॉ. किरण पाटील,
तालुका आरोग्य अधिकारी, जव्हार