आईसह १४ वर्षीय मुलाने दोन सशस्त्र चोरट्यांना दिले पकडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 05:18 IST2018-03-08T05:18:18+5:302018-03-08T05:18:18+5:30
घरात शिरलेल्या दोन सशस्त्र चोरट्यांना पकडण्याचे धाडस एका १४ वर्षीय मुलाने आपल्या आईच्या मदतीने दाखवल्याची घटना नालासोपारा शहरात घडली आहे.

आईसह १४ वर्षीय मुलाने दोन सशस्त्र चोरट्यांना दिले पकडून
वसई (पालघर) - घरात शिरलेल्या दोन सशस्त्र चोरट्यांना पकडण्याचे धाडस एका १४ वर्षीय मुलाने आपल्या आईच्या मदतीने दाखवल्याची घटना नालासोपारा शहरात घडली आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर पार्क येथील तुस्कान टॉवरमध्ये राहणाºया रेखा सालियन या बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. अर्ध्या तासाने परतल्यावर त्यांना घराचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी दबक्या पावलाने मुलासह घरात प्रवेश केला. त्यावेळी घरात तिघे हातात शस्त्रे घेऊन उभे असल्याचे त्यांना दिसले. चोरट्यांनी दोघांनाही शस्त्राचा धाक दाखवून गप्प बसण्यास सांगितले. काही वेळ गर्भगळीत झालेल्या रेखा सालियन हिंमत दाखवत सशस्त्र चोरट्यांना सामोºया गेल्या. चोरट्यांना त्या विरोध करीत असल्याचे पाहून त्यांचा चौदा वर्षांचा मुलगाही मदतीला धावून आला.
अचानक झालेल्या प्रतिकाराने तिन्ही चोरटे घाबरून गेले. संधी साधत आई आणि मुलाने एका चोरट्याला पकडून ठेवले. तसेच आरडाओरड करून मदतीसाठी धावा केला. हा आरडाओरडा ऐकून शेजारील लोक धावत आले. दोन चोरट्यांना चोप देत जमावाने पोलिसांच्या हवाली केले. मात्र, या गोंधळता तिसरा चोरटा निसटला.