13 people trapped in Demart's elevator safely released | डीमार्टच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका 

डीमार्टच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका 

ठळक मुद्देरविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास पहिल्या व तळ मजल्याच्या मध्येच अचानक लिफ्ट बंद पडली .

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या डीमार्टमधील लिफ्ट अचानक बंद पडल्याने त्यात १३ ग्राहक सुमारे दोन तास अडकून पडले होते. अग्निशमन दलाने लिफ्टच्यावरील पत्रा कापून आतील लोकांची सुटका केली . 

डीमार्टमधील इमारतीत असलेल्या अंतर्गत लिफ्टमधून रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास पहिल्या व तळ मजल्याच्या मध्येच अचानक लिफ्ट बंद पडली . लिफ्ट बंद पडल्याने आतील १३ जण अडकून पडले. लिफ्टमध्ये अडकून पडलेल्यांमध्ये ३ व ११ वर्षाची मुलं देखील होती.  लिफ्टमध्ये १३ जण अडकल्यामुळे खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले पण लिफ्ट काही सुरु झाली नाही. शेवटी रात्री पावणे आठच्या सुमारास अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले . भाईंदरच्या अग्निशमन दलाने घटना स्थळी धाव घेतली . 

लिफ्टच्यावरील पत्रा कापण्याची गरज अग्निशमन दलाने व्यक्त केली असता आधी लिफ्ट सुरु करण्याचे प्रयत्न करू अशी भूमिका व्यवस्थापनाने घेतली. त्यामुळे जवानांनी अडकलेल्याना हवा मिळत राहावी ह्याची व्यवस्था केली . व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना यश न आल्याने शेवटी सव्वा नऊच्या सुमारास अग्निशमन दलाने लिफ्टच्यावरील पत्रा कापला. त्यानंतर दोन जवान लिफ्टमध्ये उतरले व लहान शिडी लावून अडकलेल्या १३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांनी दिली.

Web Title: 13 people trapped in Demart's elevator safely released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.