पालघरच्या ११ मुलांना लागली परतीची आस; वाडा, बोईसर, वसई, विक्रमगडचे रहिवासी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 08:46 AM2022-02-27T08:46:33+5:302022-02-27T08:47:12+5:30

युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले जिल्ह्याच्या चार तालुक्यातील मिळून ११ विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत.

11 children of palghar hope to return residents of wada boisar vasai vikramgad in russia ukraine conflict | पालघरच्या ११ मुलांना लागली परतीची आस; वाडा, बोईसर, वसई, विक्रमगडचे रहिवासी

पालघरच्या ११ मुलांना लागली परतीची आस; वाडा, बोईसर, वसई, विक्रमगडचे रहिवासी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

वाडा/ वसई/विक्रमगड  :  युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले जिल्ह्याच्या चार तालुक्यातील मिळून ११ विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. ‘तेथे ते सगळे सुखरूप आहेत. आमच्या संपर्कात आहेत, तसेच लवकरच ते भारतात परततील, अशी आशा आहे. मात्र, शासनाने त्यासाठी जलद प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांच्या पालकांनी व्यक्त केली आहे.

वाडा तालुक्यातील डोंगस्ते गायकरपाडा येथील देवश्री रवींद्र गायकर, वाडा शहरातील जोहा फिरोज शेख, न्याहाळपाडा येथील सेजल विनोद वेखंडे या तीन विद्यार्थिनी युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत त्या तेथेच अडकल्या आहेत. या तीनही विद्यार्थिनी सुरक्षितस्थळी असून, त्यांना मायदेशी पाठविण्यासाठी तेथील प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. ‘लवकरात लवकर आम्हाला भारतात घेऊन या’, अशी विनंती या विद्यार्थिनींनी केली आहे. विद्यार्थिनी युक्रेनमधून रोमानिया येथे जाण्यासाठी बसमध्ये बसल्या आहेत. आठ ते दहा तासांत त्या रोमानियाला पोहोचून नंतर दिल्ली किंवा मुंबई येथे येणार असल्याची माहिती पालक विनोद वेखंडे यांनी दिली.

शिक्षणासाठी गेलेला वसई तालुक्यातील नालासोपारा वाघोली येथील एक विद्यार्थी व वसईतील दोन विद्यार्थिनी असे वसईचे तीन जण युक्रेनमध्ये अडकले आहेत. यासंदर्भात विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, आमची मुले सध्या तेथे सुरक्षितस्थळी आहेत व ती लवकरच मायदेशी परततील. विक्रमगडच्या शेलपाडा येथील रहिवासी शुभम भरत पालवी हाही शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेला असून, तोही तिथेच अडकला आहे. शुभमच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता, भरत पालवी यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत केली गेली नसून शनिवारी शुभम अन्य २ हजार विद्यार्थी ३ हजार बसचे भाडे भरून रोमानिया बॉर्डरला येण्यासाठी निघाले आहेत. १२ तासांत ते  विद्यार्थी सुरक्षित पोहचतील. शासनाकडून त्यांना सहकार्य मिळालेले नाही, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मुलांना मायदेशी आणा : पालक 

बोईसर : बोईसरचे निकिता शर्मा, महिमा थापलिया, रोशनी राजू व झील कोठावला हे चार विद्यार्थी युक्रेन येथे अडकले असून, त्यांना लवकर सुखरूप मायदेशी आणावे, अशी मागणी त्यांच्या पालकांनी केली आहे. निकिता ही मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असून, ती सध्या जेथे आहे तेथे प्रचंड युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यांना पुरेसे अन्न व पाणी मिळत नाही. फक्त येथेच थांबा, असे त्यांना सांगितले जात आहे, अशा शब्दांत निकिताच्या भावाने नाराजी व्यक्त केली.
 

Web Title: 11 children of palghar hope to return residents of wada boisar vasai vikramgad in russia ukraine conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.