रवींद्र साळवे
मोखाडा : किनिस्ते ग्रामपंचायतीमधील योगिता पुजारी या गर्भवतीने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात २५ एप्रिल रोजी एका सुदृढ बालकाला जन्म दिला. जन्मावेळी बालकाचे वजन तीन किलो असल्याचे सांगितले. मात्र, यानंतर सायंकाळी त्या बालकाला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने जव्हार कुटीर रुग्णालय येथे हलविले. तेथेही आयसीयू सुविधा किंवा त्या बालकाला वाचवू शकेल अशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने नाशिक येथे नेले. मात्र, नाशिक जिल्हा रुग्णालयात पोहोचताच काही मिनिटांतच त्या बालकाला मृत घोषित केल्याचे पालकांनी सांगितले. यामुळे आयसीयू सुविधेअभावी १०० किमीचा प्रवास करावा लागला, जर सुविधा जिल्ह्यात उपलब्ध असती तर बालकाचा प्राण वाचला असता, अशी खंत जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या घटनेने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील एका मातेला मोखाडाहून जव्हार आणि तिथून नाशिक असा १०० किमीचा प्रवास करावा लागला होता, त्यात तिचा मृत्यू झालेला. पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली असून, आता एका बालकाला जीव गमवावा लागला आहे.
त्या बालकाला श्वास घेण्यास त्रास झाल्याने जव्हार येथे हलविले होते, मात्र येथेही त्याला ऑपरेट करणे शक्य न झाल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविले. यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. मात्र, कदाचित श्वासनलिका आणि हृदयासंबंधी काही आजार जन्मत असावेत असा अंदाज आहे.
डॉ. भरत महाले, वैद्यकीय अधीक्षक, मोखाडा ग्रामीण रुग्णालय