लोकमत न्यूज नेटवर्क झडशी : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या युवकाचा रिधोरा येथील पंचधारा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली.अंकित जितेंद्र टेंभुर्णे (२१) रा. सेवाग्राम असे मृत युवकाचे नाव आहे. अंकितच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रमंडळी केक घेऊन पंचधारा धरणावर जमली होती. काही मित्र यायचे असल्याने अंकितला धरणातील पाणी पाहून पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याने लागलीच धरणात उडी घेतली. पण, धरणाच्या खोलीचा अंदाज न झाल्याने तो खोल पाण्यात बुडाला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात यश आले नाही. अखेर अंकितचा खोल पाण्यात गटांगळ्या खात मृत्यू झाला. अंकित हा एकुलता एक मुलगा असून त्याच्या पश्चात आई-वडील दोन बहिणी आहेत. त्याचे वडील जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीवर आहेत. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक निरंजने, पोलीस उपनिरीक्षक नलावडे, खैरकार, नंदू हटवार व गजू वाट यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदना करिता ताब्यात घेतला. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.