जागतिक पर्यावरण दिन : कलास्पर्शच्या माध्यमातून रंग झाले बोलके
By Admin | Updated: June 5, 2016 01:47 IST2016-06-05T01:47:16+5:302016-06-05T01:47:16+5:30
पर्यावरणाचे रक्षण ही सर्वांचीच जबाबदारी आहे. याकरिता आज प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. सोबतच पाणी व झाडे ...

जागतिक पर्यावरण दिन : कलास्पर्शच्या माध्यमातून रंग झाले बोलके
मर्मस्पर्शी चित्रांतून चिमुकल्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
वर्धा : पर्यावरणाचे रक्षण ही सर्वांचीच जबाबदारी आहे. याकरिता आज प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. सोबतच पाणी व झाडे वाचविण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक आहे. हीच बाब ओळखून आणि लहान मुलांना पर्यावरण रक्षणाची गरज मोठ्यांनी पटवून द्यावी या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिनाच्या पुर्वसंध्येला कलास्पर्श फाऊंडेशनद्वारे चिमुकल्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रांतून पर्यावरण बचावचा आगळा वेगळा संदेश देण्यात आला. चित्रकलेच्या उन्हाळी शिबिरात मुलांनी काढलेल्या सुरेख, मार्मिक व अर्थपूर्ण चित्रांमधून हा संदेश थेट काळजाला भिडणारा होता.
कलास्पर्श फाऊंडेशनचे संचालक तथा चित्रकार आशिष पोहाणे यांच्या पुढाकाराने १८ एप्रिल ते ६ जून २०१६ या दरम्यान सरस्वती विद्या मंदिर, वर्धा येथे चित्रकला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या देशाला व जगाला भेडसावणारी ‘पाण्याची समस्या’ चित्रातून समाजापुढे मांडली.
काय होती चित्रे ?
शिबिरातील वैशिष्टट्यपूर्ण अशा २५ जनजागृती संदेश चित्रवृक्षाची निवड करण्यात आली. यामध्ये किमया पोहाणे हिचे ‘पाण्याची सगळे झाले आतूर, होऊ नका देऊ वर्धेचे लातूर’ मयूर चिकटे याचे ‘उंटाच्या पोटाला नळाची तोटी लावलेले’ चित्र, भारताच्या नकाशातून पाण्याचा उपसा आणि शेतकरी आत्महत्येचा मर्म सांगणारे अभय पातोडचे चित्र, प्राजक्ता रासेकर हिने साकारलेले ‘पाण्याच्या प्रत्येक थेंबात निसर्ग हिरवा आहे.’ मंजिरी सरोदेने साकारलेले ‘आटलेल्या विहिरी व आटलेली धरणे’ आणि जन्म ते मृत्यूपर्यंत साथ देणारे पाणी हा संदेश देणारे ऋतुजा गाठे यांची चित्रे लक्षवेधी होती. त्याचबरोबर नमिरा फारूकी, मैथली अंदनकर, अभिर तन्नीरवार, रितीशा गहुकर, नेहा माळोदे, आर्या भगत, यथार्थ जुमडे, मोहीत गेलानी, वेदांत वांदीले, आसावरी वनकर यांची चित्रेही अतिशय संदेशपूर्ण होती.