जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण
By Admin | Updated: May 18, 2014 23:51 IST2014-05-18T23:51:45+5:302014-05-18T23:51:45+5:30
येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम कासवगतीने सुरु असल्याने नागरिकांची पाण्याकरिता भटकंती सुरू आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळत नाही.

जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण
गिरड : येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम कासवगतीने सुरु असल्याने नागरिकांची पाण्याकरिता भटकंती सुरू आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळत नाही. याला स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. निधी उपलब्ध असतानाही काम होत नाही, यामुळे असंतोष आहे. ग्रामसभेत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. याबाबत वृत्त असे की, १२ मे ला ग्रामसभा झाली. यावेळी ग्रामस्थांनी ग्रा. प. प्रशासनासमोर प्रामुख्याने ही समस्या मांडली. गत पाच वर्षापूर्वी फिल्टर प्लॉन्ट पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. यानंतर बांधकाम सुरू झाले. मात्र हे काम कासवगतीने सुरू असल्याने अद्याप नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होत नाही. जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी कामाची पाहणी करुन काम त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. परंतु या आदेशाला स्थानिक प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जाते. काम अपूर्ण असल्याने अजुनही पिण्यायोग्य पाणी मिळत नाही. येथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे फिल्टर प्लॉन्टचे काम कधी पूर्ण होईल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)