The work of Sevagram Development Plan is 70% | सेवाग्राम विकास आराखड्याचे काम ७० टक्के
सेवाग्राम विकास आराखड्याचे काम ७० टक्के

ठळक मुद्देमहत्त्वाची कामे पूर्ण करून राष्ट्रपित्याला करणार अभिवादन : बांधकाम विभागाचा अभिनव संकल्प

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदा भारतासह संपूर्ण जगात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी केली जात आहे. येत्या काही दिवसांवर २ ऑक्टोबर हा महत्त्वाचा दिवस असून या दिवशीपूर्वीपर्यंत वर्धा शहरातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंतचा सिमेंट रस्ता तसेच तेथील सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करीत न्युरल सुरू करून सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करणार आहे. वर्धा शहरात होत असलेले हे विकास काम सेवाग्राम विकास आराखड्यातील एक भाग आहे. तर सध्या स्थितीत सेवाग्राम विकास आराखड्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.
वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिली आहे. त्यांनी सेवाग्राम आश्रमातूनच स्वातंत्र्य चळवळीला दिशा देण्याचे काम केले. त्यामुळे या पावन भूमीचा विकास करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. त्याच अनुषंगाने सेवाग्राम विकास आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली आहे. सेवाग्राम विकास आराखड्याच्या एकूण पाच टप्प्यात विविध विकास काम हाती घेऊन ती पूर्णत्त्वास नेली जात आहेत. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत तब्बल दहा महत्त्वाचे चौक सौंदर्यीकरण, विविध भागातील रस्त्यांचे सिमेंटीकरण व डांबरीकरण, पवनार येथील धाम नदीचे सौंदर्यीकरण, सेवाग्राम येथे चरखा पॉर्इंट, सभागृह, यात्रीनिवास, पर्यटन सुविधा, फेरीवाले क्षेत्र, सुसज्ज वाचनालय, १८ किमीच्या सिमेंट नाल्या, अण्णासागर तलावाचे सौंदर्यीकरण आदी कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी ७० टक्के कामे सध्या पूर्ण झाली आहेत. येत्या काही दिवसांवर २ आॅक्टोबर हा महत्त्वाचा दिवस असून या दिवसापूर्वीपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंतचा सिमेंट रस्ता तसेच तेथील सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करीत न्युरल सुरू करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करणार आहे. तर सेवाग्राम विकास आराखड्यातील उर्वरित काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस बांधकाम विभागाचा आहे.

विकासकामांची स्थिती
सेवाग्राम विकास आराखड्यात समावेश असलेल्या महत्त्वाच्या कामापैकी पवनारच्या धाम नदी पात्राच्या सौंदर्यीकरणाचे काम ९० टक्के झाले आहे. तर सेवाग्राम येथील यात्रीनिवास, चरखा पॉर्इंट, सभागृह, १८ कि. मी. पैकी ९ कि. मी. च्या सिमेंट नाल्या, एकूण ११ महत्त्वाच्या चौकांपैकी ९ चौक परिसराच्या सौंदर्यीकरणाचे काम, न्यायालयासमोरील फेरीवाले क्षेत्र, पर्यटन सुविधेतील तीन इमारतीचे सिव्हील काम, वर्धा शहरातील व्हीआयपी मार्गाचे सिमेंटीकरण, बापूराव देशमुख पुतळा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पर्यंतच्या मार्गाचे डांबरीकरण, वाचनालयाच्या इमारतीचे ६० टक्के काम, वाहनतळाचे काम, पवनार येथील इको पार्कचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. शिवाय महिला आश्रम चौक ते सेवाग्राम रेल्वे स्थानक या मार्गाचे सिमेंटीकरण, सेवाग्राम येथील सायकल ट्रकचे काम, फेरीवाले क्षेत्र, आरटीओ कार्यालयासमोरील फेरीवाले क्षेत्र, अण्णासागर तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम अपूर्ण आहे.

शहरातील अकरा चौक घालणार भुरळ
वर्धा शहरातील महात्मा गांधी पुतळा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, बापूराव देशमुख पुतळा चौक तर सेवाग्राम येथील मेडीकल चौक, गिताई मंदिर चौक आदी एकूण दहा महत्वाचे चौक परिसराचा सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत होत असलेल्या विकास कामामुळे चेहराच बदल्या जात आहे. सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर हे चौक नागरिकांना व पर्यटकांना भुरळच घालणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा समावेश
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरूवातीला एकूण दहा महत्त्वाच्या चौकांच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु, यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाचा समावेश नसल्याचे लक्षात येताच पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून या परिसराचा विकास कामात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाचा चेहरा बदलणार आहे.

अभियंत्याचाही झाला सत्कार
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत प्रस्तावित असलेली विविध विकास कामे दर्जेदार व पारदर्शी पद्धतीने तसेच ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय मंत्री विशेष प्रयत्न करीत आहेत. त्याच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गौरविण्यात आले आहे.

यापूर्वी चरखा पॉर्इंटचे काम पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदा संकल्प सोडला आहे. त्याला १०० टक्के यशही मिळाले. त्यावेळीही प्रत्यक्ष कामातून आम्ही राष्ट्रपित्यांना अभिवादन केले होते. तर यंदा वर्धा शहरातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंतचा सिमेंट रस्ता तसेच तेथील सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करीत न्युरल सुरू करून सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करणार आहे. सध्या सेवाग्राम विकास आराखड्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.
- संजय मंत्री, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा.

Web Title: The work of Sevagram Development Plan is 70%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.