शिक्षणाचा दर्जा वाढविण्यास्तव उपक्रम राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2015 23:50 IST2015-05-05T23:50:52+5:302015-05-05T23:50:52+5:30

ग्रामीण भागातील महिला व बालकांना विशेष आरोग्य तपासणीच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविताना शिक्षणासाठी....

Work to increase the quality of education | शिक्षणाचा दर्जा वाढविण्यास्तव उपक्रम राबवा

शिक्षणाचा दर्जा वाढविण्यास्तव उपक्रम राबवा

सुधीर मुनगंटीवार : जि़प़ महिला बाल आरोग्य अभियानास प्रारंभ; पालक संपर्क अभियानामुळे पटसंख्येत वाढ
वर्धा : ग्रामीण भागातील महिला व बालकांना विशेष आरोग्य तपासणीच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविताना शिक्षणासाठी विशेष पालक संपर्क मोहीम प्रभावीपणे राबविताना सामान्य जनतेला चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जि़प़ सभागृहात महिला व बाल आरोग्य अभियान तसेच जि़प़ च्या शाळांतील पटसंख्या वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष पालक संपर्क अभियानाचा समारोप पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला़ यावेळी ते बोलत होते.
या अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जि़प़ अध्यक्ष चित्रा रणनवरे, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, उपाध्यक्ष विलास कांबळे, सभापती मिलिंद भेंडे, वसंत पाचोडे, चित्रा मानमोडे, जिल्हाधिकारी संजय भागवत, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, जि़प़ सदस्य, अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध योजना प्रभावीपणे राबविण्याची सूचना करताना पालकमंत्री पूढे म्हणाले की, ग्रामीण भागातील शिक्षणाबाबत पालकांत असलेला गैरसमज दूर करण्यासाठी शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासह सकारात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांनी केवळ नोकरी म्हणून काम न करता समाजातील अंधार दूर करण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात केवळ १०० टक्के निकाल लागणे अपेक्षित नसून दर्जेदार व चांगले विद्यार्थी घडविणे अपेक्षित आहे. शिक्षकांनीही नवीन शिकण्याचा ध्यास घेऊन चांगले विद्यार्थी घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रोत्साहन व सन्मान हे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती प्रेरणा देतात़ समाजही अशा व्यक्तींचा गौरव करतो. जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या कल्याणासाठी मिळालेल्या संधीचा चांगला वापर करावा़ विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी जि़ प़ ला संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, असेही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
शिक्षण व आरोग्य सभापती मिलिंद भेंडे यांनी जिल्ह्यातील महिला व बालकांच्या आरोग्य तपासणीमध्ये ३५० महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग आढळून आला आहे़ विविध आजार असल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे निष्पन्न झाले. अशा महिलांना संदर्भ सेवा मोफत पुरविण्यात येईल़ शिवाय जिल्हा परिषदेच्या ९५० शाळांत पटसंख्या वाढीसोबतच विविध शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात येतील, असे सांगितले.
पालकमंत्री मुनगंटीवार यांनी प्रथम आरोग्य अभियान पुस्तिकेचे विमोचन केले. विशेष पालक संपर्क अभियानाच्या चित्रफितीची माहिती घेतली. अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी स्वागत करून उपक्रमांबाबत माहिती दिली.
जि़प़ अध्यक्ष चित्रा रणनवरे यांनी जिल्हा परिषदेतर्फे पालकमंत्री सुधील मुनगंटीवार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. या अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले़ उपस्थितांचे आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डवले यांनी मानले.
यावेळी डॉ. शिरीष गोडे, कृषी सभापती श्यामलता अग्रवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, एस.एम. मेसरे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, जि़प़ पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, जि़प़ सदस्य, अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)

सामूहिक विवाह सोहळ्यात ३२ जोडपी विवाहबद्ध
पारंपरिक लग्न सोहळ्यावर होणारा खर्च व वेळ टाळण्यासाठी सर्वधर्मिय व सर्व जातीय विवाह सोहळे आयोजित करण्यात समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. अशा सोहळ्यांच्या आयोजनासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
गिताई शिक्षण संस्थेच्यावतीने पोलीस मुख्यालय मैदानात सर्व धर्मिय व जातीय ३२ वर-वधुंचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी नवविवाहित वधु-वरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, डॉ. शिरीष गोडे, जिल्हाधिकारी संजय भागवत, गिताई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ सातव, मोहन अग्रवाल, उदय मेघे, प्रविण हिवरे, नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, मंदा भोयर, संगीता वानखडे, सुरेश वाघमारे, विजय मुळे, शेखर शेंडे, शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमल कुलधरीया आदी उपस्थित होते.
सर्व धर्मिय व सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वधु-वरांचा स्वागत सोहळा तसेच सर्व धर्मियांच्या विवाह पद्धतीने साजरा होत असताना वरुणाराजाचे आगमन झाले. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी वधु-वरांना शुभेच्छा, भेटवस्तू दिल्या. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन या युवकांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. सर्व युवकांनी याचे अनुकरण करावे, असे आवाहन करताना या विवाह सोहळ्याचे अध्यक्ष प्रशांत इंगळे तिगावकर, कार्यध्यक्ष बलराज लोहवे, कोषाध्यक्ष सुनील शिंदे, सरचिटणीस अविनाश सातव व सर्व आयोजकांचा पालकमंत्र्यांनी गौरव केला. कार्यक्रमाचे संचालन इमरान राही यांनी केले. या विवाह सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना १० लाख रुपये हेक्टर दर द्या; तिमांडेंचे निवेदन
हिंगणघाट - चंद्रपूर जिल्ह्यात दिंदोडा येथे होऊ घातलेल्या निपॉन अ‍ॅण्ड डेनरो या प्रकल्पासाठी ए़एल़ए़ अ‍ॅक्ट १८९४ नुसार जमीन संपादनाची कार्यवाही १९९७ पासून सुरू आहे. या प्रकल्पात हिंगणघाट तालुक्यातील धोची, सावंगी, ढिवरी-पिपरी, खेडकी, नांद्रा (रिठ), धानोरा, शेकापूर, सावंगी (हेटी), डोरला, पारडी व अन्य गावांतील जमिनी गेल्या़ शासनाच्या निकषानुसार या जमिनीवर पाच वर्षांच्या कालावधीत प्रकल्प सुरू झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांना ‘नवीन भूसंपादन’ कायद्यानुसार १० लाख रुपये हेक्टर दर द्यावा, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांंडे यांनी केली़ यबाबत सोमवारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले़
निवेदनात जमीन संपादन केल्यापासून पाच वर्षांचा कालावधी लोटला असून प्रकल्प सुरू झाला नाही़ यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्यात याव्या. ९५ हेक्टर वन जमिनीला १ हजार १३२ कोटी रुपये वाढीव किंमत देण्यात आली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बाधित जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा.
महाराष्ट्र शासनाने २२ आॅगस्ट २०१२ रोजी अध्यादेशानुसार संपादित होणाऱ्या जमिनीला एकरी १० लाख रुपये दर देण्यात आला. तोच दर येथील शेतकऱ्यांना देण्यात यावा. सोबतच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरी, भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वाढीव मोबदला व प्रकल्पातील बाधित गावांचे सर्व सोयींनी युक्त पुनर्वसन करण्यात यावे, आदी मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या.

झोपडीधारकांना पट्टे द्या
शहरातील लोटन चौक, निशानपुरा वॉर्डातील कवडघाट रोड, गांधी- नेहरू वॉर्डातील चिमटेबाबा मंदिर, संत तुकडोज वॉर्ड व इतर झोपडपट्टी धारकांना १९९५ च्या कायद्यानुसार पक्के पट्टे देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात तत्कालीन एस.पी. अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार पोलिसांनी झोपड्या उद्ध्वस्त केल्या. यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून संसार उघड्यावर सुरू आहे. त्यांना कायम पट्टे देण्याची मागणीही तिमांडे यांनी केली़

Web Title: Work to increase the quality of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.