बॅडमिंटनकरिता सिंथेटिकऐवजी वुडन कोर्ट
By Admin | Updated: January 6, 2016 02:35 IST2016-01-06T02:35:35+5:302016-01-06T02:35:35+5:30
येथील क्रीडा संकुलात बॅडमिंटनकरिता तयार करण्यात आलेल्या सिंथेटिक कोर्टची मुदतीपूर्वीच दुरवस्था झाली.

बॅडमिंटनकरिता सिंथेटिकऐवजी वुडन कोर्ट
श्रेया केने वर्धा
येथील क्रीडा संकुलात बॅडमिंटनकरिता तयार करण्यात आलेल्या सिंथेटिक कोर्टची मुदतीपूर्वीच दुरवस्था झाली. याचा विपरित परिणाम खेळाडूंच्या प्रतिभेवर होत असल्याचे दिसून आले. यामुळे येथे आता वुडन कोर्ट तयार करण्यात येत आहे. याकरिता शासनाने ३८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केल्याची माहिती आहे.
बॅडमिंटन क्षेत्रात देशातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बजावलेल्या कामगिरीच्या आधारे या खेळाला लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्याचा प्रत्यय बॅडमिंटन लीगसारख्या स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादातून येतो. दर्जेदार बॅडमिंटनपटू तयार होण्यासाठी प्राथमिक स्तरापासून त्याची सुरुवात व्हावी, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. स्थानिक पातळीवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांप्रमाणे खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून दिल्यास गुणवंत खेळाडू तयार होण्यास ही बाब सहायकच ठरेल. याकरिताच जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टचे नूतनीकरण करण्यात येत आहे.
वर्धा येथील क्रीडा संकुलात सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट आहे. या कोर्टची अल्पावधीतच दुरवस्था झाली. सिंथेटिक कोर्टचा वॉरन्टी कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच कोटच्या चिंध्या झाल्या. मध्यंतरीच्या काळात कोर्टच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात येते. अशा कोर्टवर सराव करणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीवर विपरित परिणाम होण्याचा धोको आहे. शिवाय सराव करताना फाटलेल्या मॅटमध्ये पाय अडकल्यास खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता वर्तविली जाते. यामुळे क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टचा कायापालट होणार आहे. याकरिता ३८ लाखाचा खर्च प्रस्तावित आहे.
वुडन कोर्टवरील सरावामुळे खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा होते, असे तज्ज्ञ सांगतात. या कोर्टवर पदलालित्य वेगाने होत असून खेळताना खेळाडूला थकवा कमी जाणवतो. सिंथेटिक कोर्टवर शारीरिक क्षमतेची कसोटी लागते. तुलनेने वुडन कोर्ट खेळाडूंना सहायक ठरणारे असल्याने त्याच्या कामगिरीत व नैपुण्यात वाढ होण्यास सहायक ठरते. यामुळे वर्धेच्या बॅडमिंटन कोर्टची निर्मिती करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे.
सध्या असलेल्या बॅडमिंटन कोर्टची निर्मिती करताना दर्जा व गुणवत्ता याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अल्पावधीतच सिंथेटटिक कोर्ट खराब झाला आहे. शिवाय बॅडमिंटन हॉलचे छत गळत असल्याने सिंथेटिक कोर्ट फाटला. याची दुरूस्ती झाली नसल्याने वॉरन्टी कालावधी पूर्ण होण्याआधीच सिंथेटिक कोर्टची क्षती झालेली दिसून येते. बॅडमिंटन छतची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला असून यानंतर वुडन कोर्टच्या निर्मितीला सुरुवात होणार आहे.
दरम्यानच्या काळात वर्धेच्या क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यानेच बॅडमिंटन कोर्टसह अन्य खेळाच्या मैदानांचे नुकसान झाले आहे. ही बाब खेळाडूंच्या कामगिरीवर विपरित परिणाम करणारी आहे. जिल्हा नियोजन मंडळाने याकरिता निधी उपलब्ध करून दिला असल्याने निर्मिती कार्यातील अडसर दूर झाला आहे.
- डॉ. सुभाष रेवतकर, विभागीय उपसंचालक, क्रीडा विभाग, नागपूर.