जिल्ह्यात लवकरच स्त्री रुग्णालय

By Admin | Updated: August 5, 2014 23:49 IST2014-08-05T23:49:32+5:302014-08-05T23:49:32+5:30

जिल्ह्याच्या विकासाकरिता आलेला निधी खर्च झाला अथवा नाही, शिवाय शिल्लक असलेल्या निधीचा खर्च करण्याकरिता विविध योजना आखण्याकरिता मंगळवारी विकास भवनात जिल्हा नियोजन

Women Hospital soon to the district | जिल्ह्यात लवकरच स्त्री रुग्णालय

जिल्ह्यात लवकरच स्त्री रुग्णालय

जिल्हा नियोजन समितीची बैठक : विकास योजनांसाठी निधीचे वितरण
वर्धा : जिल्ह्याच्या विकासाकरिता आलेला निधी खर्च झाला अथवा नाही, शिवाय शिल्लक असलेल्या निधीचा खर्च करण्याकरिता विविध योजना आखण्याकरिता मंगळवारी विकास भवनात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यात जिल्ह्यात २५० खाटांचे स्त्री रुग्णालय बांधकामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रासाठी ९५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून, त्यापैकी ५७ कोटी ६७ लक्ष रुपये प्राप्त झाले. विकास कामांवर १६ कोटी ३२ लक्ष रुपये खर्च झाले असून, १९ टक्के खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत २९ कोटी ४२ लक्ष रुपयाची तरतूद प्राप्त झाली असून, एकूण ७४ टक्के खर्च झाला तर आदिवासी उपाययोजनेंतर्गत २३ कोटी ७२ लक्ष रुपयांची तरतूद असून १३ कोटी ११ लक्ष रुपये प्राप्त झाले आहे. विकास कामांवर प्राप्त झालेला निधी निश्चित कालावधीत खर्च करण्याच्या दृष्टीने तात्काळ नियोजन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत गत वर्षी सर्वसाधारण योजनेंतर्गत ८३ टक्के खर्च, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत १०० टक्के तर आदिवासी उपयोजनेंतर्गत ९२ टक्के खर्च झाला आहे. जिल्हा वार्षिक योजनेमध्ये निधीची मागणी करताना बाबनिहाय निधी मंजूर करण्यात येतो; परंतु विभाग प्रमुखांकडून वेळेवर खर्च होत नाही. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी विभागनिहाय आढावा घेवून यापुढे निधी मागताना आवश्यक असलेल्या मान्यताची पूर्ती करावी, व त्यानंतरच निधीचे वितरण करण्याच्या सूचना सभेच्या अध्यक्षांनी दिल्यात.
या बैठकीला पालकमंत्री रणजित कांबळे, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार सुरेश देशमुख, आमदार अशोक शिंदे, दादाराव केचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, विदर्भ वैधानिक मंडळाच्या सदस्य मृणालीनी फडणवीस, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, जि.प. सीईओ उदय चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत उपस्थित होते. जिल्हाधिकारी सोना यांनी समितींतर्गत गत वर्षी प्राप्त झालेला निधी व झालेला खर्च तसेच यावर्षी प्राप्त झालेल्या निधीच्या वितरणाबाबतची माहिती दिली. बैठकीचे संचालन नियोजन अधिकारी हरिष धार्मिक यांनी केले तर आभार भराडे यांनी मानले.(प्रतिनिधी)

Web Title: Women Hospital soon to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.