चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ, चोरट्यांकडून महिलांसह वयोवृद्धांना केले जातेय ‘साॅफ्ट टार्गेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 17:27 IST2022-01-20T17:17:33+5:302022-01-20T17:27:13+5:30
सध्या संक्रातीनिमित्त घराघरात हळदीकुंकवाचा कार्यक्रम होत असल्याने महिला दागिने परिधान करून जातात. महिला आणि वयोवृद्धांकडून प्रतिकार होत नसल्याने आधीच दबा धरून असलेल्या चोरट्याकडून त्यांना ‘सॉफ्ट टार्गेट’ केले जाते.

चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ, चोरट्यांकडून महिलांसह वयोवृद्धांना केले जातेय ‘साॅफ्ट टार्गेट’
वर्धा : रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रुक्मिणी नगर परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या अभ्यासाअंती हायवेलगतच्या परिसरात अशा घटना घडत असून नागरिकांनी घरात होणाऱ्या कार्यक्रमांची उदा. हळदीकुंकू, भागवत सप्ताह आदींची पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून त्या परिसरात पोलीस पेट्राेलिंग करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी आता पोलिसांना सहकार्य करावे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी दिली.
जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांत सणांची मेजवानी असल्याने अनेक जण आपापल्या घरात घरगुती कार्यक्रम आयोजित करतात. महिला व वयोवृद्धांना बोलविले जाते. महिला दागिने घालून कार्यक्रमाला जातात त्यामुळे आधीच मागावर असलेल्या चोरट्यांकडून महिलांच्या तसेच वयोवृद्धांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांची माहिती आणि घराचा पत्ता शहर पोलिसांना आणि रामनगर पोलिसांना दिल्यास संबंधित परिसरात पोलीस गस्तीवर राहून परिसराची पाहणी करून संशयास्पद फिरणाऱ्यांची चौकशी करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी केले आहे.
मुसाफिरांचा लोंढा पोलीस तपासणार
कोरोनानंतर शहरात मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्ह्यासह राज्यातील मुसाफीर दाखल झाले आहेत. विविध ठिकाणी हे नागरिक कुटुंबासह दुकाने थाटून बसलेले आहेत. अशांची तपासणी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि गुन्हे शोध पथकांकडून तपासणी करण्यात येणार आहे. जर असे कुणी घराजवळ संशयास्पद फिरताना दिसून आल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ ते रात्री ८ च्या दरम्यान घडतात घटना
सध्या संक्रातीनिमित्त प्रत्येक घराघरात हळदीकुंकवाचा कार्यक्रम होतो. तसेच कुणाकडे भागवत, वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याने अनेक महिला दागिने परिधान करून जातात. महिला आणि वयोवृद्धांकडून प्रतिकार होत नसल्याने आधीच दबा धरून असलेल्या चोरट्याकडून त्यांना ‘सॉफ्ट टार्गेट’ केले जाते. सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजताच्या कालावधीत अशा घटना घडल्या आहेत.
दवंडी फिरवून नागरिकांमध्ये जनजागृती
रामनगर आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्या परिसरात अशा घटना घडल्या आहेत त्या परिसरात सायंकाळी ५ ते रात्री आठ वाजेपर्यंत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दवंडी फिरविण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती केली जाणार आहे.