विदेशी नागरिकासह महिलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:59 IST2019-07-29T21:59:11+5:302019-07-29T21:59:35+5:30
विदेशात नोकरी लावून देतो. शिवाय व्हिजा मिळवून देण्याची हमी देत नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीतील एका विदेशी पुरुषासह एका भारतीय महिलेला हिंगणघाट आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण १.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विदेशी नागरिकासह महिलेला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदेशात नोकरी लावून देतो. शिवाय व्हिजा मिळवून देण्याची हमी देत नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीतील एका विदेशी पुरुषासह एका भारतीय महिलेला हिंगणघाट आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण १.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट येथील सौरभ नामदेव कावळे याला आरोपींनी फोनकरून तूला आणि तुझ्या एका मित्राला विदेशात नोकरी लावून देतो, असा ई-मेल संभाषणातून आमिष दिले. शिवाय विदेशात जाण्याकरिता व्हीजाची गरज असल्याने फिर्यादीला व त्याचे मित्राला व्हीजा काढून देतो असेही कळविण्यात आले. त्यांच्यावर विश्वास करून सौरभ आणि त्याच्या मित्राने आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यात एकूण ३ लाख ४३ हजार १५० रुपयांचा भरणा केला. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सौरभ कावळे याने हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपास सुरू केला. दरम्यान तांत्रिक बाबींसाठी स्थानिक गुन्हे शाखेचा एक भाग असलेल्या सायबर सेल मधील पोलिसांची मदत घेण्यात आली. शिवाय सर्वप्रथम संबंधित बँकाकडून माहिती घेण्यात आली. बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्याचा धागा गवसला. त्यानंतर पोलिसांच्या चमुने मुंबई गाठून काही ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रिकरण पडताळले. वेळोवेळी मिळत गेलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्नामार एरीकोयानाथन (३२) ह.मु. वसई (वेस्ट), जिल्हा पालघर या महिलेला ताब्यात घेतले. तिला विचारपूस केल्यानंतर या कामात आणखी काही जण असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुळचा नायजेरीया येथील रहिवासी असलेल्या अॅडम टिमीटायो जॉनसन (४०) ह. मु. नालासोपारा, जि. पालघर याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता नागरिकांना गंडा घालण्यासाठी एक मिनी बनावटी कॉलसेंटरच तयार करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
त्याच्या घरातून पोलिसांनी संगणक, मोबाईल, राऊटर, इंटरनेट, डोंगल, वेगवेगळ्या कंपन्यांचे सिमकार्ड, बँक खात्याचे पासबूक, ए.टी.एम. कार्ड, क्रेडीट कार्ड, चेक बूक व इतर कागदपत्रे असा एकूण १ लाख ३५ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे, हिंगणघाटचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे, वसंत शुक्ला, भारती ठाकरे, समीर गावंडे, राहूल साठे, उमेश लडके, सचिन घेवंदे आणि सायबर पोलीस ठाण्याचे निलेश कट्टोजवार यांनी केली.
अनेक बेरोजगारांना गंडा घातल्याचा संशय
हिंगणघाट आणि सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून एका विदेशी नागरिकासह भारतीय महिलेला अटक केली आहे. हे दोघेही संगणमत करून होतकरू बेरोजगारांना आपल्या जाळ्यात अडकवित होते. शिवाय त्यांच्याकडून लाडीलबाडीने पैसेही उकळत होते, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. या टोळीतील सदस्यांनी अनेक होतकरू बेरोजगारांना गडा घातला असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.
सदर आरोपीच्या मागावर असलेल्या पोलिसांसाठी बॅँकेकडून मिळालेली माहिती फायद्याची ठरली. याच माहितीच्या आधारे कुठल्या एटीएममधून पैसे काढण्यात आले, याची माहिती पोलिसांना मिळू शकली. त्यानंतर पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींना जेरबंद केले.