महिनाभरातच सिमेंट बंधाऱ्याला तडा
By Admin | Updated: August 26, 2015 02:13 IST2015-08-26T02:13:06+5:302015-08-26T02:13:06+5:30
तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला विस्तारीकरण व खोलीकरण करण्यात आले.

महिनाभरातच सिमेंट बंधाऱ्याला तडा
जलयुक्त शिवार योजना : निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा शेतकऱ्याचा आरोप
रूपेश मस्के कारंजा (घा.)
तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला विस्तारीकरण व खोलीकरण करण्यात आले. त्यावर सिमेंट बांध बांधण्याची कामे करण्यात आली; पण यातील बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झालीत. यामुळेच एक महिन्याच्या आतच बंधाऱ्यांना तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. या कामांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
जलयुक्त शिवार अभियानात तालुक्यात बऱ्याच ठिकाणी केवळ खोदकाम करून निधीची उचल करण्यात आली. नाला विस्तारीकरण व शिवारातील पाणी शिवारात अडविणार असल्याने शिवार जलयुक्त होणे, शिवारातील विहिरींच्या जलस्त्रोतात वाढ होणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. शिवारातील शेतात बंधाऱ्याचे पाणी शिरल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते. तालुक्यातील उमरी या गावात बारंगे यांचे शेत आहे. त्यांच्या शेताला लागून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला खोलीकरण व सिमेंट बंधारा बांधण्यात आला. या सिमेंट बंधाऱ्याला लगेच तडे गेले आहेत. तांत्रिकदृष्ट्या याचे बांधकाम न झाल्याने बारंगे यांच्याा शेतात बंधाऱ्याचे पाणी शिरले. यामुळे संपूर्ण शेत खरडून गेले असून त्यांचे मोठे नुकसान झाले.
या नुकसानाला निकृष्ट दर्जाचे व तांत्रिकदृष्ट्या अयोग्य झालेले काम पर्यायाने कृषी विभाग जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत नुकसान भरपाई द्यावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
योग्यरीत्या खोदकाम न केल्याने शेती गेली खरडून
शिवाय जलयुक्त करणे, मृत जलस्त्रोत पुनर्जीवित करणे व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी या उद्देशाने शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. वर्धा जिल्ह्यातही या योजनेंतर्गत कामे सुरू झाली. काही ठिकाणी योग्य कामे होत असली तरी कारंजा तालुक्यात निकृष्ट कामे झाल्याचे दिसून येत आहे. योग्यरित्या खोदकाम व बांधकाम न केल्याने उमरी येथील शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. शेतीच खरडून निघाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या संपूर्ण कामांची चौकशी करून कारवाई करणे गरजेचे झाले आहे.