अकरा गावांतील बांधकामाचा प्रश्न निकाली निघणार?
By Admin | Updated: December 10, 2014 23:01 IST2014-12-10T23:01:57+5:302014-12-10T23:01:57+5:30
स्थानिक नगर परिषदेच्या हद्दीला लागून असलेल्या गावांमध्ये बांधकामांना परवानगी नाकारण्यात आली होती़ यामुळे नागरिकांची गोची झाली होती़ शिवाय शहरातील रामनगर व अन्य भागातील

अकरा गावांतील बांधकामाचा प्रश्न निकाली निघणार?
वर्धा : स्थानिक नगर परिषदेच्या हद्दीला लागून असलेल्या गावांमध्ये बांधकामांना परवानगी नाकारण्यात आली होती़ यामुळे नागरिकांची गोची झाली होती़ शिवाय शहरातील रामनगर व अन्य भागातील लिजचे प्रकरणही कित्येक वर्षांपासून प्रलंबित होते़ या दोन्ही प्रकरणांचा निपटारा होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत़ नगरविकास राज्यमंत्र्यांनी नागपूर येथे याबाबत गुरूवारी (दि़११) बैठकीचे आयोजन केले आहे़ नागपूर अधिवेशनातही यावर चर्चा होणार असल्याचे संकेत आहेत़
स्थानिक नगर परिषदेचे विद्यमान हद्दीस लागून असलेल्या पिपरी (मेघे), आलोडी, नालवाडी, म्हसाळा, चिंचाळा, चितोडा, बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), सिंदी (मेघे), उमरी, दत्तपूर या ११ गावांसाठी परिसर योजना तयार करण्यात आली आहे़ याबाबत १५ जून १९९५ अन्वये शासन राजपत्रात प्रसिद्धीही करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिमेमध्ये गावठाण क्षेत्राबाहेरील बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार संबंधित ग्रामपंचायतींना नसल्याचा उल्लेख करण्यात आला़ यामुळेच संबंधित ग्रामपंचायतींनी गावठाण क्षेत्राबाहेर बांधकामाची परवानगी देण्याचे नाकारले आहे. गावठाण क्षेत्राबाहेर बांधकामाची परवानगी देण्याकरिता नियोजन प्राधिकरण घोषित करण्याबाबत १९ एप्रिल व १६ जुलै २०१२ अन्वये अपर मुख्य सचिव, नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे; पण अद्याप शासन स्तरावरून नियोजन प्राधिकरण घोषित करण्यात आलेले नाही.
वर्धा जिल्हा हद्दीकरिता प्रदेश स्थापन करणे व त्यासाठी प्रादेशिक योजना (रीजनल प्लॅन) तयार करण्याबाबत कार्यालयाचे पत्र ४ डिसेंबर २०१३ अन्वये प्रधान सचिव, नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अद्याप प्रादेशिक योजनाही मंजूर करण्यात आलेली नाही. यामुळे अकरा गावांतील नागरिक व बांधकाम व्यावसायिकांची गोची झाली आहे़ आता बैठकीमुळे दोन्ही प्रकरणांचा निपटारा होण्याची चिन्हे दिसत आहेत़(कार्यालय प्रतिनिधी)