विद्यार्थ्यांत रूजविले जातेय वन्यजीव संरक्षणाचे बीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 22:59 IST2017-10-04T22:59:28+5:302017-10-04T22:59:41+5:30

विद्यार्थ्यांत रूजविले जातेय वन्यजीव संरक्षणाचे बीज
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विद्यार्थ्यांच्या मनात वन्य प्राणी व वन संपत्तीच्या संगोपनाचे बीज रुजावे या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून १ आॅक्टोबर ते ७ आॅक्टोबर या कालावधीत वर्धा वन विभाग व न्यू आर्टस् कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह राबविल्या जात आहे. सदर उपक्रमादरम्यान तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना इत्यंभूत माहिती देण्यात येत असून चार गटात राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली. सदर चित्रकला स्पर्धत सुमारे सहाशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
सदर सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखक मारोती चितमपल्ली, नागपूरचे एपीसीसीएफ एस. एच. पाटील, गवई, वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, आशीष गोस्वामी आदींची उपस्थिती होती. सोमवार २ आॅक्टोबरला विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये वन्य प्राण्यांच्या संगोपनाबाबत आवड निर्माण व्हावी या हेतूने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा स्थानिक न्यू आर्टस् कॉलेजमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गट ‘अ’ इयत्ता एक ते चार यासाठी ‘सजीव सृष्टी’, गट ‘ब’ इयत्ता पाच ते सात यासाठी ‘एक रम्य पहाट’ व गट ‘क’ इयत्ता आठ ते दहा यासाठी ‘पर्यावरण व परिसंस्था’ तसेच गट ‘ड’ इयता अकरावी ते खुला यासाठी ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ हा विषय होता. मंगळवार ३ आॅक्टोबरला विद्यार्थ्यांनी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प गाठून विविध वन्य प्राण्यांची माहिती जाणून घेतली. यावेळी काही तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना वन्य प्राणी व वनसंपदा या विषयावर मार्गदर्शनही केले. एकूणच या सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये वनविभागावतीने वन्यजीव संगोपनाचे बीज रुजविले जात आहे.
आज जनजागृती रॅली
वन्य जीव सप्ताहाचा एक भाग म्हणून गुरूवार ५ आॅगस्टला स्थानिक न्यू आर्टस् अॅन्ड कॉमर्स कॉलेज परिसरातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीला खा. रामदास तडस हिरवी झेंडी दाखविणार असून कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपवन संरक्षक दिगांबर पगार आदींची उपस्थिती राहणार आहे. या जनजागृती रॅलीत विद्यार्थी-विद्यार्थिनींसह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटनेचे सदस्य असे २ हजाराहून अधिक नागरिक सहभागी होणार आहेत. सदर रॅली शहरातील मुख्य मार्गक्रमण करणार असून रॅलीचा समारोप न्यू आर्टस् अॅन्ड कॉमर्स कॉलेजमध्ये होणार आहे. या रॅलीत तीन चित्ररथाचा समावेश राहणार असून त्याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.