पशुपालन अर्थसाहाय्य योजना ठरली पांढरा हत्ती
By Admin | Updated: October 15, 2014 23:22 IST2014-10-15T23:22:21+5:302014-10-15T23:22:21+5:30
जिल्ह्यात वनविभागाचे क्षेत्र हे बरेच आहे. त्यामुळे पशुपालकांची संख्या ही लक्षणीय आहे. असे असतानाही चराईसाठी पशुधन मात्र मोठ्या प्रमाणात घटले चालले आहे. ते वाढावे यासाठी पशुपालन अथसहाय्य

पशुपालन अर्थसाहाय्य योजना ठरली पांढरा हत्ती
वर्धा : जिल्ह्यात वनविभागाचे क्षेत्र हे बरेच आहे. त्यामुळे पशुपालकांची संख्या ही लक्षणीय आहे. असे असतानाही चराईसाठी पशुधन मात्र मोठ्या प्रमाणात घटले चालले आहे. ते वाढावे यासाठी पशुपालन अथसहाय्य योजना तयार करण्यात आली. पण शासकीय अधिकाऱ्यांच्या दफ्तरदिरंगाईमुळे ही योजना केवळ पांढरा हत्ती ठरत आहे.
जिल्ह्यातील पशुधन घटत चालले आहे. ते वाढावे यासाठी शासनाने पशुपालन व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या आहेत. परंतु त्या योजना कागदावरच असल्याचे वास्तव दिसून येत आहे. जगण्याचे मुख्य साधन म्हणून शेतीकडे पाहिल्या जाते. आजही ग्रामीण भागातील जनतेचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीबरोबरच कुटुंबाचे अर्थचक्र व्यवस्थित चालावे यासाठी पशुपालनावर भर दिला जातो. सध्या पशूपालन हा व्यवसाय करीत असलेल्यांसाठी अनेक योजना आहेत. पण शासन त्याची योग्य माहितीच देत नसल्याने आणि अनुदान देताना त्रास देत असल्याने या योजना कागदावरच उरल्या आहेत.
स्वातंत्र्यानंतर शेती व्यवसायात सातत्याने वैशिष्टपूर्ण बदल झाले आहेत. अयोेग्य नियोजन, निसर्गाने न दिलेली साथ, व्यवसायासाठी कर्जाऊ घेतलेल्या भांडवलाचे वाढलेले व्याज, वाढती महागाई आदी प्रश्नांमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पशुपालन हा शेतकऱ्यासांठी आर्थिक आधार ठरत आहे. मात्र शासनाने राबविलेल्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचत नसल्याने आर्थिक स्वावलंबनात अनेक अडचणी येत आहेत. पाच वर्षात सतत होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता शासनाने पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांना अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या. परंतु, अद्यापही या योजनांचा पुरेपूर उपयोग झाला नाही, ग्रामीण भागात मोजक्याच लोकांना या योजनाबद्दलची माहिती मिळाली आहे. बऱ्याच लोकांना योजनाच माहित नसल्याने योजना या पांढरा हत्ती ठरत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)