पाश्चिमात्य देशही भारतीय संस्कृती व सभ्यतेचे केंद्र बनत आहे
By Admin | Updated: February 11, 2015 01:43 IST2015-02-11T01:43:35+5:302015-02-11T01:43:35+5:30
विजय दर्डा : स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा बाल उद्यानाचे लोकार्पण

पाश्चिमात्य देशही भारतीय संस्कृती व सभ्यतेचे केंद्र बनत आहे
पुलगाव : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जगात आपण भरपूर प्रगती केली आहे, परंतु आपल्या संस्कृतीपासून आपण दूर जात आहो. आईला मम्मी व बाबाला डॅॅडी म्हणण्याची प्रथा पडत आहे. ‘आई’ शब्दात जो गोडवा आहे, तो मम्मी म्हणण्यात नाही. आपल्या संस्कृतीत सभ्यता व संस्कार आहेत. संस्कारानेच देश बनतो. आपल्या देशासारखा संस्कारित देश दुसरा नाही. यामुळेच पाश्चिमात्य देशही आज भारतीय संस्कृती व सभ्यतेचे केंद्र बनत आहे, असे मौलिक विचार लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
येथील आर. के. कॉलनीतील स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा बालोद्यानाचे लोकार्पण खा. दर्डा यांच्या हस्ते मंगळवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रफुल्ल दर्डा होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष मनीष साहू, माजी जि. प. सदस्य दिलीप अग्रवाल विराजमान होते.
खा. दर्डा पुढे म्हणाले, आज प्रत्येकाला प्रदूषणमुक्त, उत्साहाचे व आनंददायी जीवन पाहिजे आहे. उद्यानातील विविध रंगाची फुले, हिरव्यागार पसरलेल्या वेली, मोकळीक, स्वच्छ हवा, प्रदूषणमुक्त वातावरणच माणसाला आनंददायी जीवन देऊ शकते. कुठल्याही गावातील, शहरातील, खेड्यातील रस्ते बागबगिचे, शैक्षणिक संस्था प्रदूषणमुक्त व्यवस्था ही त्या गावाची ओळख असते. या उद्यानाच्या निर्मितीच्या कल्पकतेबाबत त्यांनी प्रफुल्ल दर्डा व स्व. खुशालचंद दर्डा यांचा आवर्जून उल्लेख केला. या शहराशी आपले भावनिक नाते आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी शहराच्या स्वच्छतेसोबतच या उद्यानाला सहकार्याचा हात द्यावा, अशा सूचनाही केल्या.
आपला देश भगवान महावीरांच्या शांती व अहिंसेच्या मार्गावर चालत आहे. हे तत्त्वज्ञान संपूर्ण जगाने अंगिकारले असून जगातील १०९ देशांत आज भगवान महावीरांची मंदिरे उभारण्यात आली आहेत, असे सांगून त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व विषद करीत अनेक दाखले दिले. खा. दर्डा यांच्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपये या उद्यानाच्या निर्मितीसाठी देण्यात आले असून उद्यानात हायमॉस्ट लाईट देण्याची घोषणाही यावेळी केली. याप्रसंगी सकल जैन समाजाच्यावतीने प्रा. प्रकाशचंद्र श्रीश्रीमाल, प्रा. हुकूमचंद पहाडे, पंकज श्रीश्रीमाल यांनी किसनलाल भट्टड, राजेंद्र गरपाळ, लुंकड परिवारातील सुभाष, गौतम, शीतल, रिया दर्डा, विलास भट्टड यांच्यासह अनेकांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राजीव बतरा, शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश सावरकर, मुख्याधिकारी राजेश भगत, न.प. सभापती प्रमोद घालणी, महिला काँग्रेसच्या रंजना पवार, शकील खान, सुनील कोठावळे, प्रदीप दर्डा, आनंद दर्डा, बजाज यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी दिलीप अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रफुल्ल दर्डा यांनी, संचालन डॉ. विजय राऊत यांननी केले तर आभार प्रा. श्रीश्रीमाल यांनी मानले.
नगर परिषद प्रांगणात वृक्षारोपण
तत्पूर्वी पालिकेद्वारे नगर परिषदेत नगराध्यक्ष साहू व मुख्याधिकारी राजेश भगत यांनी खा. दर्डा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. न.प. प्रांगणात खा. दर्डा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी या शहराशी आपल्या बालपणापासून असलेल्या संबंधांचा यावेळी आवर्जून उल्लेख केला.(तालुका प्रतिनिधी)
बालपणीच्या आठवणी व बाबूजींच्या स्मृतींना उजाळा
स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा बालोद्यानाचे लोकार्पण केल्यानंतर लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी पुलगाव शहरात आपले बालपण गेले. या शहरात खेळलो, बागडलो. या शहराशी आपले भावनिक नाते आहे, या शब्दात पुलगावशी असलेल्या नात्याचा उलगडा केला. या बालोद्यानाशी माझ्या भावना जुळल्या हे सांगताना त्यांनी श्रद्धेय बाबूजींच्या स्मृतींना उजाळा दिला. हे बालोद्यान संस्काराचे केंद्र व्हावे, येथे मने जुळली जावी, यासोबतच लहानमुलांना खेळताना इजा होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली जावी, या मोैलिक तेवढ्याच आपुलकीचे नाते सांगणाऱ्या सूचनाही खा. दर्डा यांनी यावेळी उपस्थितांना केल्यात.