नऊ बीटचा भार एकाच पोलीस ठाण्यावर
By Admin | Updated: February 9, 2015 23:18 IST2015-02-09T23:18:59+5:302015-02-09T23:18:59+5:30
शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. लोकसंख्येत भर पडत असताना ग्रामीणचे चार आणि शहरातील पाच अशा एकूण नऊ बीटचा भार सद्यस्थितीत हिंगणघाट पोलीस स्टेशनवर आहे.

नऊ बीटचा भार एकाच पोलीस ठाण्यावर
भास्कर कलोडे - हिंगणघाट
शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. लोकसंख्येत भर पडत असताना ग्रामीणचे चार आणि शहरातील पाच अशा एकूण नऊ बीटचा भार सद्यस्थितीत हिंगणघाट पोलीस स्टेशनवर आहे. यामुळे कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेत पोलिसांची संख्या मात्र तोकडी आहे. ग्रामीण भागाकरिता स्वतंत्र पोलीस ठाणे देण्याची मागणी होत आहे.
हिंगणघाट ठाण्यातील पोलिसांना नागरिकांच्या समस्यांना तप्तरतेने न्याय देण्यात अडसर येत आहे. तक्रारी सोडविण्यासाठी यंत्रणा तोकडी पडत आहे. शहराच्या विस्तारीत भागासह ग्रामीणच्या चार बीटसाठी नव्या ग्रामीण पोलीस स्टेशनची निर्मिती करणे गरजेचे झाले आहे.
येथील पोलीस स्टेशन अंतर्गत शहरातील काजी वॉर्ड, मातामंदिर वॉर्ड, शास्त्री वॉर्ड, गांधी वॉर्ड, निशानपूरा, लाडकी, बुरकोनी, वाघोली तसेच समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव बीटचा समावेश आहे. स्थानिक पोलीस स्टेशनला निरीक्षक, सहायक निरीक्षकासह, सहायक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नायक, शिपाई, वाहन चालक असे एकूण १३२ तैनाती आहे. प्रत्यक्षात अधिकारी व कर्मचारी असे एकूण १२४ जण कर्तव्यावर असून आठ कर्मचाऱ्यांची उणीव आहे. कर्तव्यावरील एकूण कर्मचाऱ्यांपैकी दररोजची साप्ताहिक सुटी, आजारी व वैकल्पिक सुट्यावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ३० असल्याने केवळ ९० कर्मचाऱ्यांना ९ बीटच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडावी लागते. ही वास्तविकता आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासाठी पाच, स्थानिक न्यायालयीन कामकाजाठी तीन, जिल्हा न्यायालयासाठी दोन तर वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी १० व समन्स वारंट पोहचविण्यासाठी सहा अशा एकूण २६ कर्मचाऱ्यांची पूर्तता झाल्यानंतर उर्वरित अधिकारी व कर्मचारी ६४ तर कामाचा व्याप मात्र अधिक अशी स्थिती आहे. यापैकी २० जणांकडे पेट्रोलिंगची जबाबदारी असल्याने त्यांचा परिणाम प्रलंबित प्रकरणाच्या तपासावार होत आहे.
जिल्ह्यात हिंगणघाट शहर संवेदनशील मानल्या जाते. जिल्हा सीमेवरील दारूबंदीचा भार येथील पोलिसांवर आहे. अवैध रेती वाहतूक, सणासुदीचा बंदोबस्त, निवडणूक सभा, बैठक, अपघात, शेतकरी आत्महत्या, खून, मारामाऱ्या व नैसर्गिक आपत्ती यासह रेल्वे गेट नं. १४ च्या चालू बंदमुळे दिवसातून अनेकदा विस्कळीत होणारी वाहतूक हिंगणघाट पोलिसाकरिता डोकेदुखी ठरते.
काळानुसार गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे पद्धत सुद्धा बदलली तालुक्यातील लघु उद्योगाची संख्या वाढतीवर असून परप्रांतीय मजुरांची संख्याही येथे अधिक आहे. पोलिसांची संख्या व पोलिसांवरील कामाचा भार याची जनसामान्यांना जाणीव असली नसली तरी कायदा व सुव्यवस्था मात्र कायम राहावी, गुन्ह्यांचा शोध तत्परतेने लागावा, नवीन गुन्हे घडू नये, अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे. मात्र याकरिता येथील यंत्रणा तोकडी पडत असल्याची बाब प्रकर्षांने जाणवते. अशा स्थितीत जनतेला न्याय देण्यासाठी थोडी फार पोलीस संख्या वाढविण्याऐवजी शहरात स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशनची निर्मिती केल्यास पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होईल. तसेच जबाबदारी पार पाडताना कोणतीच समस्या भेडसावणार नाही.