विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By रवींद्र चांदेकर | Updated: April 13, 2025 20:56 IST2025-04-13T20:55:56+5:302025-04-13T20:56:08+5:30

नळगंगा-वैनगंगा नदी जोड प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

We want to erase the stigma of drought on the face of Vidarbha says CM Devendra Fadnavis | विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्धा : विदर्भातील अनेक जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असते. सिंचनाची सुविधाही कमी आहे. राज्य शासनाने आता वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. यातून विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आर्वी येथे रविवारी ७२० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या ई-भूमिपूजन, लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. मंचावर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे, आमदार सुमित वानखेडे. आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी जितीन रहमान, आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पावर एक लाख कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. विशेष विमानाने संपूर्ण परिसराचे मॅपिंग आटोपले आहे. या प्रकल्पामुळे तब्बल ५५० किलोमीटरची नवीन नदीच तयार होणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, आदी जिल्ह्यांतील शेतकरी, जनतेला त्याचा लाभ होणार आहे. ६२ टीएमसी पाणी मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

८० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत १२ तास वीज

पंतप्रधान सूर्यघर योजनेमुळे अनेक घरे, अनेक गावे सौरऊर्जेकडे वळत आहेत. आर्वी तालुक्यातील नेरी (पुनर्वसन) हे गाव १०० टक्के सौरऊर्जामय झाले. सौर कृषी योजनेत पुढील काळात १६ हजार मेगावॉट वीज उपलब्ध होईल. परिणामी २०२६ च्या शेवटपर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा १२ तास मोफत वीज उपलब्ध होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नागपूरएवढेच वर्धा जिल्ह्यावर प्रेम

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांची नागपूर एवढेच वर्धा जिल्ह्यावर प्रेम असल्याचे सांगितले. त्यामुळेच त्यांनी सेवाग्राम, पवनार कृती आराखडा, जिल्हा बँकेला १६३ कोटींची मदत केल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा विकास आता थांबणार नाही, असे सांगितले. आमदार सुमित वानखेडे यांच्या काम करण्याच्या हातोटीचे डॉ. पंकज भोयर यांनी कौतुक केले. यावेळी खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे, आमदार सुमित वानखेडे यांनी आपल्या मनोगतातून विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. प्रास्ताविक जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले.

Web Title: We want to erase the stigma of drought on the face of Vidarbha says CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.