आपल्याला श्रमातून आनंद घेता यावा
By Admin | Updated: March 23, 2017 00:49 IST2017-03-23T00:49:18+5:302017-03-23T00:49:18+5:30
आजच्या वेगाने बदलत्या जगात गती हा परवलीचा शब्द झालेला आहे. त्यातून येणाऱ्या ताणाचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होतो.

आपल्याला श्रमातून आनंद घेता यावा
प्रभाकर पुसदकर : गुणवत्ता शाश्वती उपक्रमात कार्यप्रवणता कार्यशाळा
वर्धा : आजच्या वेगाने बदलत्या जगात गती हा परवलीचा शब्द झालेला आहे. त्यातून येणाऱ्या ताणाचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होतो. आपण बदलत्या काळाची नवी तंत्रे व व्यवस्थापनाची योग्य सवय विकसित केली तर आपल्याला आपल्या दैनंदिन कामकाजातून आनंद घेता येतो, असे मत नई तालिम समितीचे प्रभाकर पुसदकर यांनी व्यक्त केले.
येथील प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात गुणवत्ता शाश्वती कक्षाच्या वतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता कार्यप्रणवता कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी साधन व्यक्ती म्हणून ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन वसंत वाडिभस्मे, प्राचार्य डॉ. रंभा सोनाये, गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. धनंजय सोनटक्के, विजय चौधरी, दिनेश भगत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या कामाची योग्य ती दखल घेवून तसेच त्यांना प्रेरणा देऊन व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांची कार्यप्रवणता वाढविता येते, असे ते पुढे म्हणाले. या अनुषंगाने पुसदकर यांनी काही कसोट्यांचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना करून दाखविले.
आपल्यात असलेले अंगभूत गुण न लपविता त्याचा उपयोग आपल्या कार्यालयीन कामांना अधिक आनंददायी व उत्तमप्रकारे करून घेण्यासाठी करून घ्यावा असे आवाहन मान्यवरांनी केले.
कार्यशाळा आयोजनाची भूमिका डॉ. सोनटक्के यांनी विशद केली. कार्यक्रमाचे संचालन दिनेश भगत यांनी तर आभार विजय चौधरी यांनी मानले. या कार्यशाळेत वर्धा शहरातील विविध महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आयोजनाला प्रमोद माथनकर, विनोद बावणे, राजू मुंजेवार, नरेश आगलावे, डॉ. अनिता देशमुख, डॉ. मालिनी वडतकर, डॉ. सुधाकर सोनोने, डॉ. प्रतिभा ताकसांडे, डॉ. प्रियराज महेशकर, डॉ. सोनाली सिरभाते, प्रा. अमोल घुमडे, डॉ. रेखा बोबडे, प्रा. मदनमोहन विश्वकर्मा यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)