समन्वयाची शेती ठरली विकासाचा मार्ग
By Admin | Updated: May 10, 2015 01:34 IST2015-05-10T01:34:55+5:302015-05-10T01:34:55+5:30
तालुक्यातील रेहकी येथील दोन मावसभावांनी एकत्र येत समन्वयाने शेती करून विकासाचा मार्ग शोधला आहे.

समन्वयाची शेती ठरली विकासाचा मार्ग
सेलू : तालुक्यातील रेहकी येथील दोन मावसभावांनी एकत्र येत समन्वयाने शेती करून विकासाचा मार्ग शोधला आहे. या दोघांनी पाऊण एकरात थोडा थोडका नाही तर तब्बल सव्वा लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. पंकज झाडे व श्रीकांत धानकुटे या दोघांनी पारंपरिक शेतील फाटा देत भाजीपाल पीक घ्यायला सुरुवात केली. पाऊण एकर शेतीत वर्षभर पारंपारिक पिकांसोबतच भाजीपाल्याचे नियोजन करून सोयाबीन, कापूस, यासोबतच मेथी, भेंडी, ऊस आदी पिके घेत त्यांनी आर्थिक बाजू भक्कम केली.
पंकज झाडे याच्याकडे वडीलोपार्जित अडीच एकर शेती आहे. १५ वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पंकजचे वडील नियमित भाजीपाल्याचीच शेती करायचे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पंकजने तो गुण हस्तगत केला आहे. त्याला साथ दिली त्याचा मावसभाऊ श्रीकांतने. कारण पंकज जवळ शेती जेमतेम, पाण्याचा अभाव व सतत अडीच एकरात भाजीपाला बाराही माहिने घेतल्यामुळे जमीन आता सध्या भाजीपाल्यासाठी योग्य नाही. यामुळे श्रीकांतने मदतीचा हात देत पंकजच्या या उपक्रमात स्वत:ची शेती त्याला दिली. पावसाळ्यात सोयाबीनचे पीक घेतले. पाऊण एकरात अवघे तिनच पोते सोयाबीनचे उत्पन्न झाले. त्यानंतर त्याच जमिनीवर त्यांनी मेथीचे पीक घेतले. त्यातून ३० हजार रुपये खर्च वजा जाता नफा मिळाला होता. मेथीचे पीक दोन महिन्यात घेतल्यानंतर भेंडीचे उत्पादन घेण्यात आले. यातही नफा झाला. दोघांनी मिळून शेती केल्यामुळे पंकज उत्पादनाच नियोजन पाहतो तर श्रीकांत बाजारपेठेत ने-आण करण्याच्या खर्चाचे नियोजन करतो. (तालुका प्रतिनिधी)