पाण्यासाठी वन्यप्राणी गावांकडे
By Admin | Updated: May 9, 2015 02:05 IST2015-05-09T02:05:37+5:302015-05-09T02:05:37+5:30
तालुक्यातील जंगलांमध्ये वास्तव्यास असलेल्या वन्यप्राणी तहान भागविण्याकरिता गावांच्या दिशेने धाव घेत आहे.

पाण्यासाठी वन्यप्राणी गावांकडे
आर्वी : तालुक्यातील जंगलांमध्ये वास्तव्यास असलेल्या वन्यप्राणी तहान भागविण्याकरिता गावांच्या दिशेने धाव घेत आहे. यात शेतातील भाजीपाल्याच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अपघाताचे प्रमाण वाढीत आहे.
तालुक्याचा काही भाग हा जंगलव्याप्त आहे. जंगलाला लागून असलेल्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न अगोदरच बिकट रूप धारण करीत असताना खरांगणा येथून काही अंतरावर सुरू होणाऱ्या जंगलात वास्तव्य करणारे प्राणी गावाच्या दिशेने धाव घेत आहे. महाकाळी येथील जलाशयाच्या काठावर हे प्राणी आपला तहान भागविताना पाहावयास मिळतात. या भागात असलेल्या शेतांमध्ये भुईमूग, संत्रा यासह इतर पिकांची लागवड केली आहे. या पिकांवर प्राणी ताव मारत असल्याने नुकसान होत असल्याच्या तक्रारी वनविभागाकडे केल्या जात आहे. मात्र उपाययोजना होताना दिसत नाही.
आर्वी शहरापासून अवघ्या १५ कि़मी. अंतरावर असलेल्या धनोडी(ब.) गावालगत निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती झाली. या प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेत शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची लागवड केली. पाण्याच्या दिशेने आलेली जंगली श्वापदे धनोडे भागातील धरणाकाठच्या शेतांमधील पिकांचा फडशा पाडत आहेत.
धरणातून नदीपात्रात पडणाऱ्या पाण्याच्या जोरावर घेण्यात आलेली पिके संकटात सापळली आहेत. रस्त्याकाठच्या गावामध्ये रात्रीच्या सुमारास रोह्यांचे दर्शन होताना दिसते. डुकरांचे कळप सुसाट वेगात आर्वी-पुलगाव मार्ग ओलांडताना दिसतात. हा प्रकार वर्धमनेरी गावालगत वाहणाऱ्या नदीच्या पुलावर आढळतो. रोहणा ते पिंपळखुटा जाणाऱ्या मार्गावरील जंगलात असलेल्या वन्यप्राण्यांनी गावापर्यंत धाव घेतली आहे. चोरांबा, बोदड येथील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विरुळ, रसुलाबाद, कृष्णापूर, रामपूर, वडाळा, वाई आदी भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्याच्या शोधार्थ येणाऱ्या वन्यप्राण्यांनी नुकसान केले आहे.
आर्वी ते कौंडण्यपूर जाणाऱ्या मार्गावरील गावामधील नागरिकांकडून वन्यप्राण्यांबाबतच्या तक्रारी ही नित्याचीच बाब झाली आहे. टाकरखेड येथील शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांनी मोठे नुकसान केले. नांदपूर येथे पाण्याच्या शोधार्थ भटकणाऱ्या प्राण्यांमुळे दुचाकी चालकांचे किरकोळ अपघात झाले.
जंगलामध्ये वन्यप्राण्यांना पिण्याकरिता पाणी नाही. उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाचा जीव उन्हाने कासावीस होतो. त्यामुळे स्वत:ची तहान भागविण्यासाठी सदर जनावरे ही गावाकडे धाव घेतात. त्यामुळे ही बाब वनविभागाने गांभिर्याने घेत वन्यप्राण्यांच्या पाण्याची ठोस व्यवस्था जंगलातच करावी, अशी मागणी वन्यप्रेमी आणि शेतकरी करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)