खैरी धरणातील कालव्याच्या गेटमधून पाण्याचा अपव्यय
By Admin | Updated: July 21, 2014 00:20 IST2014-07-21T00:20:39+5:302014-07-21T00:20:39+5:30
खैरी धरणाच्या मातीच्या भिंतीखाली असलेल्या कालव्याच्या गेटमधून दर तासाला एक लाख लिटर पाणी वाया जात आहे़ याबाबत अनेकदा निदर्शनास आणून देऊनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहे़

खैरी धरणातील कालव्याच्या गेटमधून पाण्याचा अपव्यय
कारंजा (घा़) : खैरी धरणाच्या मातीच्या भिंतीखाली असलेल्या कालव्याच्या गेटमधून दर तासाला एक लाख लिटर पाणी वाया जात आहे़ याबाबत अनेकदा निदर्शनास आणून देऊनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहे़ अद्यापही कालव्याचे गेट बंद करण्याचे सौजन्य कुणी दाखविले नसल्याचे दिसते़
सध्या धरणात पाणी कमी आहे. यावर्षी पाऊसही कमी झाला़ नागरिकांना प्यायला पाणी नाही़ असे असले तरी एप्रिल महिन्यापासून या कालव्याच्या गेटमधून पाणी वाहून जात असल्याची माहिती शेजारच्या ग्रामस्थांनी दिली. कालव्याचे गेट तांत्रिक दोषामुळे पूर्णपणे बंद करीत नाही, हे खरे असले तरी हा तांत्रिक दोष दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न अधिकारी करीत नाही, हे वास्तव आहे. प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने दर तासाला एक लाख लिटर पाणी वाया जात आहे. या वाया जाणाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांना फायदा तर होत नाहीच, उलट या धरणाच्या काठाशी असलेल्या ‘नारा अधिक २२’ पाणी पुरवठा योजनेला पाणी कमी मिळून फटका बसला आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत या कालव्याच्या गेटमधून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो़ यानंतर एप्रिल महिन्यापासून हे गेट पूर्णपणे बंद करून पिण्याकरिता पाणी धरणात साठविले जावे, असा आदेश आहे; पण यावर्षी या गेटमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला़ तो दोष दूर करण्यात स्थानिक अधिकाऱ्यांना यश आले नाही. परिणामी, पाणी वाहून जात आहे. पं.स. च्या सभेत याबाबत काही प्रतिनिधींनी संबंधित प्रशासनाला प्रश्न विचारला असता गेट बंद केले असून पाणी वाहणे बंद झाल्याची खोटी व दिशाभूल करणारी माहिती सभागृहाला देण्यात आली.
खरोखरच या गेटमधून पाण्याचा अपव्यव होतोय काय, याची पाहणी सरपंच नितीन दर्यापूरकर, उपसरपंच नरेश चाफले, ग्रा.पं. सदस्य नितीन चोपडे, कमलेश कठाणे, संजय मस्की, नारा येथील उपसरपंच आशिष टावरी यांनी केली़ यात पाण्याचा अपव्यव सुरू असल्याचे निदर्शनास आले़ वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे धरणाची पातळी झपाट्याने कमी झाली असून नारा अधिक २२ नळयोजना व कारंजा नळ योजना या दोन्ही योजनांना फटका बसला आहे़ त्वरित उपाययोजना व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़(शहर प्रतिनिधी)