देवळीतील मलकापूर झाले जलयुक्त
By Admin | Updated: August 5, 2016 02:00 IST2016-08-05T02:00:10+5:302016-08-05T02:00:10+5:30
पावसाळ्यात नाल्याचे पाणी शेतात शिरुन खरीप पीक नष्ट होत होते. एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाला

देवळीतील मलकापूर झाले जलयुक्त
५३७ दलघमी पाणीसाठा : शेतकऱ्यांनी केली डाळिंबाची लागवड
वर्धा : पावसाळ्यात नाल्याचे पाणी शेतात शिरुन खरीप पीक नष्ट होत होते. एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाला तरच रबी पिकाची शाश्वती मलकापूर गावातील शेतकऱ्यांना होती. पण जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या नाला खोलीकरणामुळे शेतात पाणी शिरण्यास पायबंद बसला आणि नाल्याकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसू लागले. कित्येक वर्षात ज्या शेतात खरीपाचे पिकच आले नाही, त्या शेतात सोयाबीन, कापूस व तुरीचे पीक आज डौलाने उभे आहे.
देवळी तालुक्यातील मलकापूर हे गाव कायम टंचाईग्रस्त गाव. मागील वर्षी या गावाची आणेवारी ५० टक्केच्या आत होती. २०१५-१६ मध्ये या गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली आणि गावाचे चित्रच पालटले. गावाच्या एकूण पाण्याच्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये सिमेंट नाला बांधासह नाला खोलीकरणाची सहा कामे, दोन साठवण बंधारे आणि पाणी पुरवठा योजनेच्या स्त्रोत बळकटीकरणासाठी भूमिगत रिचार्ज शाप्ट पाच अशी एकूण १३ कामे घेण्यात आली. त्यापैकी आठ कामे पूर्ण झाली असून पाच कामे प्रगतीपथावर आहे. गावाच्या एकूण वाटर बजेटींग नुसार ९१ टक्के पाण्याचे बजेटींग पूर्ण झाले आहे. सध्या गावात ५३७.६४ दलघमी पाणीसाठा असून या पाण्याचा उपयोग सुमारे ५३७ हेक्टराच्या सिंचनासाठी होणार आहे. या संपूर्ण कामासाठी १ कोटी ४६ लक्ष रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी पूर्ण झालेल्या कामावर ७० लक्ष ६७ हजार रुपये खर्च झाले आहे.
जलयुक्त शिवारमधील झालेल्या कामामुळे विशेषत: नाल्याकाठच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतांना दिसत आहे.
पिण्याच्या पाण्याची काळजी मिटली. हे गाव कायम पाणी टंचाईग्रस्त होते. गावात ग्रामीण पाणी पुरवठा योजना आहे; मात्र या योजनेसाठी वापरण्यात येणारी विहीर उन्हाळ्यात कोरडी व्हायची. त्यामुळे गावात पाणी पुरवठा होत नव्हता. जलयुक्त शिवारमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या स्त्रोत विहिरीजवळ रिचार्ज शाप्टची कामे करण्यात आली. यामुळे यावर्षी विहिरीची पाणी पातळी वाढली आहे. पुढील उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही अशी आशा आहे.
- साधना नेहारे, सरपंच, मलकापूर
नाल्यालगत माझी पाच एकर शेती असून शेतात विहीर आहे. मात्र रब्बी पिकाला विहिरीचे पाणी पुरत नव्हते. पण नाला खोलीकरणाचे कामामुळे यावर्षी विहिरीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे दोन एकरात मी डाळिंबाची लागवड केली आहे. पावसाळ्यानंतर विहिरीच्या पाण्यावर डाळिंब शेती जगवता येईल.
- प्रशांत निवल, शेतकरी,मलकापूर