लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा / आर्वी : तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनेच्या १ एप्रिल ते ३० जून २०२० या कालावधीतील आराखड्यातील तिसऱ्या टप्प्यात ४१ गावांचा समावेश आहे.पाणीटंचाई असलेल्या गावात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सर्वेक्षण केले असून पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा निश्चित केला आहे. तालुक्याकरिता ८६ लाख २१ हजारांचे तरतूद करण्यात आली आहे.आर्वी तालुक्यातील पाच गावांतील विहिरी पाणीटंचाई निवारणाच्या पार्श्वभूमीवर अधिग्रहित करण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यात कोणत्याही गावात पाणीटंचाई भासत नसल्याने एकाही ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त न झाल्याची माहिती निरंक होती.१ जानेवारी ते ३१ मार्च २०२० च्या दुसऱ्या टप्प्यात २८ गावांचा समावेश होता. यात २० गावांत विहीर खोलीकरण करण्याचा प्रस्ताव होता. १ एप्रिल ते ३० जूनपर्यंतच्या तिसऱ्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणार्थ आराखड्यात ४१ गावांचा समावेश आहे. यात प्रस्तावित योजनेतील उपलब्ध साधनात सार्वजनिक विहिरी ७, खाजगी विहिरी १, हातपंप ७, तर २ नळयोजनेचा समावेश आहे. अप्रचलित उपाययोजनेत तालुक्यातील २४ सार्वजनिक विहिरी खोल करणे, ६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, याचा समावेश आहे. प्रचलित उपाययोजनेअंतर्गत २० तात्पुरत्या विशेष दुरुस्तीचा समावेश आहे, तर १३ नवीन विंधन विहिरी घेण्याचा प्रस्तावित योजनेत समावेश आहे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना सुरूतालुक्यातील बाजारवाडा, सालदरा या दोन गावांतील काही भागात नागरिकांना पाणी मिळत नसल्याने विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहे, तर सावंगी (पोड) येथे पूर्वीपासूनच पाणीटंचाई आहे. नांदपूर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम सुरू आहे, तर खुबगाव येथील पाणीपुरवठा करणारी विहीर धरणात गेली आहे. त्यामुळे या पाच गावातील विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांना पंचायत समितीने सादर केला आहे.हातपंप दुरुस्ती करणारे पथक हवेआर्वी तालुक्यात ७२ ग्रामपंचायती असून २२४ गावे ग्रामपंचायत हद्दीत येतात. तालुक्यातील या गावात एकूण ४२२ हातपंप आहेत. नियमितपणे सरासरी एका आठवड्यात दहा ते बारा ग्रामपंचायतीतील हातपंप तांत्रिक कारणांमुळे नादुरुस्त असल्याच्या तक्रारी येथील पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे येतात. मागील महिनाभरापासून कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे हातपंप दुरुस्ती करणारे युनिट आठ दिवस वर्ध्यात, तर आठ दिवस आर्वीत असते. या कालावधीत नादुरुस्त हातपंप दुरुस्त करता येत नसल्याने अनेक ठिकाणी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे नियमित हातपंप दुरुस्ती करणारे पथक आर्वीतील ग्रामीण भागात देणे गरजेचे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे अगत्याचे आहे.गतवर्षी गडद झाले होते जलसंकटगतवर्षी फेब्रुवारी-मार्चपासूनच जलसंकट गडद झाले होते. आर्वी तालुक्यातील अनेक गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. यावर्षी मात्र, धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक आहे. संभाव्य धोका टाळण्याकरिता प्रशासनाने भरीव तरतूद केली आहे.
आर्वीत ४१ गावांत पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST
आर्वी तालुक्यातील पाच गावांतील विहिरी पाणीटंचाई निवारणाच्या पार्श्वभूमीवर अधिग्रहित करण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यात कोणत्याही गावात पाणीटंचाई भासत नसल्याने एकाही ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त न झाल्याची माहिती निरंक होती.
आर्वीत ४१ गावांत पाणीटंचाई
ठळक मुद्देपाच गावातील विहिरी होणार अधिग्रहित : ४२२ हातपंपांपैकी अनेक नादुरुस्त