मुख्य रस्त्याला पाण्याचे ग्रहण

By Admin | Updated: July 29, 2016 02:10 IST2016-07-29T02:10:41+5:302016-07-29T02:10:41+5:30

शहरालगतच्या हनुमान टेकडी परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातून निघालेले अशुद्ध पाणी...

Water Eclipse on Main Street | मुख्य रस्त्याला पाण्याचे ग्रहण

मुख्य रस्त्याला पाण्याचे ग्रहण

संबंधित विभागाचे दुर्लक्ष : प्राधिकरणच्या पाण्यामुळे रस्त्यावर चिखल
वर्धा : शहरालगतच्या हनुमान टेकडी परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातून निघालेले अशुद्ध पाणी सतत मुख्य रस्त्यावरून वाहते. परिणामी, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गांधी सिटी पब्लिक स्कूल समोर तर चिखलाचे साम्राज्यच निर्माण झाले आहे. तीनही ऋतूमध्ये वाहणारे हे पाणी नागरिकांकरिता डोकेदुखी ठरत आहे. प्राधिकरणने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक तसेच गांधी सिटी पब्लिक स्कूलकडून करण्यात येत आहे.
हनुमान टेकडीवर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून सायंकाळच्या सुमारास दररोज अशुद्ध पाणी बाहेर फेकले जाते. हे पाणी टेकडीवरून खाली उतरून मुख्य रस्त्याच्या बाजूने वाहत असल्याने परिसर चिखलमय होतो. परिणामी, नागरिकांना तसेच चिमुकल्यांना त्रास सहन करावा लागतो. गांधी सिटी पब्लिक स्कूलसमोरच चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच परिसरातून विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावी लागते. वर्षभर वाहणाऱ्या पाण्यामुळे काही ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे. यात वाहने रूतत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पाणी आणि चिखलामुळे व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत. याबाबत पिपरी (मेघे) ग्रामपंचायत तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे तक्रारी करण्यात आल्या; पण अद्याप कार्यवाही झाली नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

 

Web Title: Water Eclipse on Main Street