जलयुक्त शिवार; १०० कोटींवर निधी खर्च

By Admin | Updated: November 2, 2016 00:39 IST2016-11-02T00:39:06+5:302016-11-02T00:39:06+5:30

शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधेत वाढ व्हावी आणि भूजलस्तर वाढावा म्हणून राज्य शासनाद्वारे जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे.

Water-cooled shiver; Fund expenditure up to 100 crores | जलयुक्त शिवार; १०० कोटींवर निधी खर्च

जलयुक्त शिवार; १०० कोटींवर निधी खर्च

४२६ गावांचा समावेश : ६ हजार ८३० पैकी २ हजार ७५३ कामे पूर्ण, उर्वरित कामे प्रगतिपथावर
वर्धा : शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधेत वाढ व्हावी आणि भूजलस्तर वाढावा म्हणून राज्य शासनाद्वारे जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. यात जिल्ह्यात २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये निवडलेल्या ४२६ गावांतील ६ हजार ८३० पैकी २ हजार ७५३ कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी १०० कोटींवर खर्च करण्यात आला असून शेतीच्या सिंचनातही मोठी वाढ झाली आहे.
मागील वर्षी २०१५-१६ मध्ये २१४ गावे निवडण्यात आली होती. यात २ हजार ६६८ कामे करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी २ हजार ४५६ कामे पूर्ण करण्यात आली होती. उर्वरित २१६ कामे प्रगती पथावर आहेत. यावर्षी २०१६-१७ मध्ये २१२ गावांची निवड करण्यात आली असून ४ हजार १६२ कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. यातील २९७ कामे पूर्ण झाली असून ३ हजार ८६५ कामे अद्याप व्हायची आहेत. ४१४ कामांना सुरूवात करण्यात आली असून उर्वरित कामे आता पावसाळा संपल्याने हाती घेण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
५ डिसेंबर २०१४ रोजी शासनाने जलयुक्त शिवार योजनेचा अध्यादेश काढला; पण कामांची गती संथ होती. यामुळे ही कामे किती दिवस चालणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. २०१५ पासून वर्धा जिल्ह्यात कामाचे उद्दिष्ट देण्यात आले. २०१५-१६ मध्ये २१४ गावांत २ हजार ६६८ कामांचे उद्दिष्ट होते. यापैकी २ हजार ४५६ कामे पूर्ण करण्यात आलीत. या योजनेत केलेल्या कामांवर ९५ कोटी ६ लाख रुपये खर्च करण्यात आले असून २१२ कामे सुरू आहेत. या कामांवर ५३ कोटी ९६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. २०१६-१७ मध्ये २१२ गावांतील ४ हजार १६२ कामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी २९७ कामे पूर्ण झाली असून यावर ८ लाख रुपये खर्च झाले. ३ हजार ८६५ पैकी ४१४ कामे सुरू आहे. २०१६-१७ साठी १४५ कोटी ४८ लाख रुपये खर्चाचे नियोजन आहे. या योजनेमुळे विहिरींची पातळी वाढल्याचे दिसते.(तालुका प्रतिनिधी)

विविध विभागांकडून केली जात असलेली कामे
कृषी विभागाकडून सलग समतल चर, खोल समतल चर, ढाळीची बांध बंदिस्ती, रूंद सरी वरंभे (बीबीएफ), माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, नाला रूंदीकरण व खोलीकरण, अर्दन स्ट्रक्चर शेततळे, पुनर्भरण चर, लूज बोल्डर स्ट्रक्चर, गॅबीयन स्ट्रक्चर, फळबाग लागवड, ठिबक/तुषार, सिमेंट नाला बांध दुरूस्ती, नाला खोलीकरण आदी कामे केली जात आहेत.
जि.प. लघुसिचंन विभागाद्वारे साठवण बंधारे, गाव तलाव, नाला बांध सिमेंट, पाझर तलाव, कोल्हापूरी बंधारा, कोल्हापूरी/सिमेंट नाला बांधकाम दुरूस्ती, सिचंन तलाव दुरूस्ती, पाझर तलाव दुरूस्ती, गाव तलाव दुरूस्ती व इतर लघु सिंचन साठवण बंधारे, कोल्हापूरी बंधारे, नाला बांध सिमेंट, गाव तलाव, पाझर तलाव आदी कामे केली जातात.
वन विभागाकडून वृक्ष लागवड, सलग समतल चर, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण (मिटर), वनतळी, दगडी बांध, गॅबीयन स्ट्रक्चर, खोल सलग समतल चर, तलाव दुरूस्ती आदी कामे केली जातात. सामाजिक वनिकरणद्वारे सलग समतल चर, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड आदी कामे केली जातात.
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेद्वारे नवीन विंधन विहीर, भूमिगत बंधारा, रिचार्ज ट्रेंच/नाला खोलीकरण व सरळीकरण, रिचार्ज शाफ्ट इतर/ जलभंजन ही कामे होतात.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे नवीन विंधन विहीर, पाणी पुरवठा योजनेजवळ नाला खोलीकरण, रिचार्ज शाफ्ट/दुरूस्ती कामे, भूमिगत बंधारा, आडवे बोअर आदी कामे होतात.
पाटबंधारे विभाग कालवा दुरूस्ती, विहीर पुनर्भरण, वृक्ष लागवड, नवीन विहीर आदी कामे करतो.
सीएसआर निधीमार्फत लोकसहभागातून विहीर पुनरूजीवन, चेकडॅम, शेततळी, विहीर पुनर्भरण, पाझर तलाव, ग्रुप वेल, ड्रीप सिंचन पद्धती, तुषार सिंचन, वनराई बंधारा, बोरी बंधारा, लिफ्ट ईरिगेशन पद्धती, रिचार्ज पिट, पुनर्भरण चर सह गॅबियन बंधारा, लूज बोल्डर, ढाळीचा बांध बंदिस्ती आदी कामे केली जात आहेत.

Web Title: Water-cooled shiver; Fund expenditure up to 100 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.