जलयुक्त शिवाराचा पिकांना फायदा होणार
By Admin | Updated: August 22, 2015 02:21 IST2015-08-22T02:21:19+5:302015-08-22T02:21:19+5:30
महाराष्ट्र शासन कृषी व जलसंधारण विभाग ‘सर्वासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमानुसार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मौजा सास्ती या निवड झालेल्या गावात...

जलयुक्त शिवाराचा पिकांना फायदा होणार
वर्धा : महाराष्ट्र शासन कृषी व जलसंधारण विभाग ‘सर्वासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमानुसार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मौजा सास्ती या निवड झालेल्या गावात जुन्या सिमेंट बंधाऱ्याचे नूतनीकरण, नालाखोलीकरण, रुंदीकरण व शेततळे उभारण्याचे काम नियोजित आहे. याचा अपेक्षित निधी ५४ लाख आहे. याचा खरीप व रबी दोन्ही हंगामात फायदा होईल, असे मत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले.
सास्ती येथे आमदार कुणावार यांच्या हस्ते जलपूजन आणि वृक्षारोपण करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमांतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणीही त्यांनी केली. सध्या नाला खोलीकरण व रुंदीकरणाची चार कामे झालेली असून कामाची लांबी ५६० मिटर आहे. त्यावर ११.७५ लाख रुपये खर्च झाला आहे. सदर नाला खोलीकरण व रुंदीकरण कामामुळे २७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे शिवारातील नाल्याच्या परिघातील १७ विहिरीच्या जलस्तरामध्ये १०० टक्के वाढ झालेली आहे. दुबार व तिबार हंगामासाठी सिंचनाची व्यवस्था झालेली असल्याचेही ते म्हणाले.
गावचे सरपंच विकास इंगळे आमदार कुणावार यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. ता.कृ.अ. एस.डी.साखरे व मोरे यांनी सदरील कामाचे उद्दीष्ट, उपलब्ध पाणी साठा व कामावर झालेला खर्च या बाबत सविस्तर माहिती दिली. मेश्राम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जलपुजन कार्यक्रमाला जि. प. सदस्य माधुरी चंदनखेडे, वसंत आंबटकर, प्रफुल्ल बाहे, माजी जि. प.सदस्य ओंकार मानकर, पं. स.सदस्य माधव चंदनखेडे, उपसरपंच सरोज बोरकर, ग्रा. पं. सदस्य गजानन उमाटे, डॉ. टी. वाय. ठाकरे, प्रा. किरण वैद्य, ग्रा. प. पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यशस्वीतेकरिता एस. आर. रहाटे, ए. व्ही. कोहळे, आर. जी. कुबडे, अमोल भडे, गुजरकर आदींनी सहकार्य केले.