तालुक्यात दहा गावांवर जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:18 IST2018-04-19T00:18:38+5:302018-04-19T00:18:38+5:30
एप्रिल महिन्याच्या मध्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट तीव्र होते. यावर्षीही आर्वी तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत दहा गावांत पाणीटंचाईचे सावट तीव्र झाले आहे.

तालुक्यात दहा गावांवर जलसंकट
सुरेंद्र डाफ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : एप्रिल महिन्याच्या मध्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट तीव्र होते. यावर्षीही आर्वी तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत दहा गावांत पाणीटंचाईचे सावट तीव्र झाले आहे. यात या दहा गावांतील ४ हजार ८८८ लोकसंख्या असणाऱ्या ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मे महिन्यात ही पाणीटंचाई अधिक तीव्र होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
आर्वी तालुक्यातील धनोडी, टेंभरी, परसोडी, एकलारा, कर्माबाद, पिंपळझरी, मारडा, दिघी, साखखेडा, हिवरा या दहा गावांचा पाणीटंचाईत समावेश आहे. याबाबत १ एप्रिल ते ३० जून या तीन महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाई उपाययोजना कृती आराखडा अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजनेला सुरूवात झाली आहे. आर्वी तालुक्यातील या दहा गावांना पाणीटंचाई भासू नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत.
या दहा गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी २२ सार्वजनिक विहिरी, २२ खासगी विहिरी, ३१ हातपंप, दोन विद्युतपंप व सहा नळयोजना अशा उपाययोजना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सूचविण्यात आल्या आहेत. हे सर्व पाण्याचे स्त्रोत असले तरी नवीन कृती आराखड्यानुसार एक सार्वजनिक विहीर खोल करणे, तीन गावांत खासगी विहिरीचे बांधकाम करणे तथा अधिग्रहण करणे, सहा ठिकाणी नवीन हातपंप बसविणे, धनोडी व एकलारा या गावात नळयोजनेची विहीर दुरूस्त करणे, टेंभरी येथे पाईपलाईन दुरूस्त करणे, आदी उपाययोजनांचा समावेश करण्यात आलेला अआहे. यात या गावांत येत्या तीन महिन्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी दखल घेत कार्यवाही करणे गरजेचे आहे.
आर्वी तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कृती आराखड्यांतर्गत तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहीर अधिग्रहित करणे तथा नळयोजना व इतर तातडीच्या उपाययोजना आखणे सुरू आहे.
- प्रा. धर्मेंद्र राऊत, उपसभापती, पं.स. आर्वी.