सोयाबीनच्या अत्यल्प उताऱ्याने बळीराजाच्या डोळ्यांत पाणी
By Admin | Updated: October 7, 2015 00:37 IST2015-10-07T00:37:15+5:302015-10-07T00:37:15+5:30
सोयाबीन.. शेतकऱ्याचे वार्षिक आर्थिक नियोजन ठरविणारे पीक़ दिवाळीच्या तोंडावर निघाणाऱ्या या उत्पादनामुळे बळीराजाच्या घरची दिवाळी साजरी होते.

सोयाबीनच्या अत्यल्प उताऱ्याने बळीराजाच्या डोळ्यांत पाणी
सरासरी एकरी एक ते दोन पोते : शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले
वर्धा : सोयाबीन.. शेतकऱ्याचे वार्षिक आर्थिक नियोजन ठरविणारे पीक़ दिवाळीच्या तोंडावर निघाणाऱ्या या उत्पादनामुळे बळीराजाच्या घरची दिवाळी साजरी होते. यंदा मात्र हे समीकरण बदलण्याचे संकेत आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन ते अडीच पोत्यांची उतारी येत असल्याने त्यांच्या डोळ्यात पाणी येत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीपात १ लाख २२ हजार हेक्टरवर पेरा झाला. पाऊस उशिरा आल्याने यंदा पेरा कमी झाल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. सोयाबीनचा पेरा झाल्यांनतर पावसाने मारलेल्या दडीने अंकुरलेल्या रोपट्यांची वाढ खुंटली. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना आलेल्या पावसामुळे सोयाबीनला जीवनदान मिळाल्याचे बोलले जाऊ लागले. सोयाबीनचे उत्पन्न बऱ्यापैकी येईल असे वाटत असताना पुन्हा पावसाची गरज असताना पावसाने दडी मारली. सायोबीनच्या शेंगा भरण्याची वेळ असताना तापणाऱ्या उन्हामुळे आलेल्या शेंगा भरल्याच नाही. परिणामी उत्पादनात घट होत असल्याचे दिसून येत आहे.
केवळ उत्पादनातच नाही तर हाती येत असलेल्या सोयाबीनचा दाणाही बारीकच आहे. यामुळे निघणाऱ्या उत्पादनाला दरही मिळणे कठीण झाले आहे. यंदाच्या पीक स्थितीवरून कृषी विभागाने हेक्टरी सहा ते सात पोते सोयाबीन होईल असा अंदाज व्यक्त केला होता; मात्र तसे झाले नाही. वास्तविकतेत एकरी अर्धे, कुठे एक पोत्याची उतारी येत आहे. सोयाबीन सवंगण्याच्या काळापर्यंत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे सोयाबीन जळाल्याने काही भागातील शेतकऱ्यांनी ते सवंगण्याचे टाळले आहे. शेतात असलेले पीक आता पूर्णत: जाळण्याचा निर्णय देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)
गतवर्षी हेक्टरी पाच पोत्यांची उतारी
गतवर्षी दुष्काळी स्थिती असताना शेतकऱ्यांना सोयाबीनची हेक्टरी ४.४१ क्विंटल उतारी आली होती. यंदा मात्र तसेही होत नसल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या हंगामात गत वर्षीच्या तुलनेत बिकट स्थिती असल्याचे दिसून आले आहे. आर्थिक सोय नसताना शेतकऱ्यांनी उधार उसणे घेत पेरा केला; मात्र पावसाने दिलेल्या दग्यामुळे यंदा कुठलेही उत्पन्न होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आला आहे.
शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनमधून किती रुपयांचे उत्पन्न निघेल हे सांगणे सध्या कठीण झाले आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणी करण्याचे टाळले आहे. काही भागात सवंगणी करून सोयाबीन काढण्याचे काम होत असले तरी कुटारही निघण्याची शाश्वती राहिली नसल्याचे शेतकरी बोलत आहे. देवळी तालुक्यातील सोनेगाव, डिगडोह व आगरगाव या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात असलेले उभे पीक जाळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
शेतीची वस्तुनिष्ठ पैसेवारी काढण्याची मागणी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाची नजरअंदाज पैसेवारी ६७ टक्केच्यावर निघाली आहे. परंतु यावर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे सोयाबीन पिकाची परिस्थिती फारच चिंताजनक आहे. सरासरी उतारा हा एकरी १ ते २ क्ंिवटलवरही येणार नाही.