वर्धा पॅटर्नने ४० गावे ‘सुजलाम’
By Admin | Updated: July 2, 2015 02:30 IST2015-07-02T02:30:26+5:302015-07-02T02:30:26+5:30
पिण्याच्या पाण्याची सतत टंचाई भासणाऱ्या जिल्ह्यातील ४० गावांना वर्धा पॅटर्नने मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे.

वर्धा पॅटर्नने ४० गावे ‘सुजलाम’
सर्व गावांना शाश्वत पाणी पुरवठा : पेयजल कार्यक्रमांतर्गत राबविलेला उपक्रम
वर्धा : पिण्याच्या पाण्याची सतत टंचाई भासणाऱ्या जिल्ह्यातील ४० गावांना वर्धा पॅटर्नने मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. भूजल सर्वेक्षणाच्या विकास यंत्रणेने टंचाईग्रस्त गावांमध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत राबविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमामुळे पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले आहे.
वर्धा पॅटर्नमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करण्याच्या उपक्रमांतर्गत भूमिगत सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण त्यानंतर रिचार्ज शाफ्टसारख्या उपक्रमांचा प्रथमच उपयोग करण्यात आला. या संशोधनात्मक उपक्रमामुळे ४० गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपला आहे. यामुळे या संशोधनात्मक उपक्रमाला ‘वर्धा पॅटर्न’ म्हणून संबोधले जात आहे. सेलू तालुक्यातील मेनखत या आदिवासीबहुल गावात वर्धा पॅटर्ननुसार पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत बळकटीकरणाचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. यामुळे मेनखत, जुवाडी, खैरी या पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांना कायमस्वरूपी पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. अशाच प्रकारचा उपक्रम झाडगाव (वर्धा), सिंगारवाडी (देवळी), भैय्यापूर (हिंगणघाट), येणगाव (कारंजा) अशा विविध गावांत हा उपक्रम मागील दोन वर्षांपासून यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. ही सर्व गावे आता कामयस्वरूपी पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईमुक्त झाली आहेत.
वर्धेच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे टंचाईवर मात करण्यासाठी एक आव्हान म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करताना रिचार्ज साफ्ट सारखा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. यासाठी पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ नाल्यात ३० मीटर खोलीचे व १५० मिमी व्यासाच्या विंधन विहीर खोदण्यात येऊन त्यात पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीला थेट रिचार्ज करण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. पावसाचे अथवा नदी व नाल्याचे पाणी पुनर्भरणासाठी साधारणत: बराच कालावधी लागतो; पण या उपक्रमामुळे अतिखोल जलधारक खडकाला थेट पुनर्भरण करणे सोयीचे झाले आहे. हा उपक्रम वर्धा जिल्ह्यात यशस्वी झाल्यामुळेच राज्यातील इतर जिल्ह्यांतही पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी वर्धा पॅटर्नचाच वापर करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन यांनी दिली.
नागपूर विभागातही पिण्याच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेद्वारे भूमिगत सिमेंट बंधारा, नाला खोलीकरण आणि रिचार्ज शाफ्टचा वापर होत असल्याची माहिती उपसंचालक डॉ. आय.आय. शाह यांनी दिली. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांमुळे पाण्याच्या बाबतीत सध्या ४० गावे सुजलाम झाली असून अन्य गावांतील पाणी टंचाईही कायम मिटणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
अशी आहे कामाची पद्धत
वर्धा पॅटर्नमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण अंतर्गत भूमिगत सिमेंट बंधारा नळयोजनेच्या विहिरीच्या खालच्या भागात नाल्यावर बांधण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने किमान सहा मीटरपर्यंत म्हणजे असच्छिद्र/कठीण खडक लागेपर्यंत खोदून त्या खोलीकरण सिमेंट काँक्रीटची भिंत बांधण्यात येते. यामुळे वरील पाच ते सहा मीटरपर्यंत अस्तित्वात असलेल्या संधीयुक्त विघटीत खडकातून वाहून जाणारे पाणी अडविले जाते. यामुळे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतील पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन हा स्त्रोत शाश्वत होतो.
यास पूरक म्हणून विहिरीच्या वरच्या भागात नाला विरूद्ध दिशेला एक ते तीन मीटरपर्यंत खोल करण्यात येत असून त्यामध्ये ३० मीटर खोलीचे ३ ते ५ रिचार्ज शाफ्ट खोदण्यात येतात. यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात साठविण्यास मदत होऊन जलस्त्रोताचे पुनर्भरण होते. शिवाय नाल्यातील पाणी रिचार्ज शाफ्टद्वारे अतिखोल जाऊन थेट पुनर्भरण होण्यास मोठी मदत होते. या तीनही बाबींमुळे नळ योजनेचा स्त्रोत हा शाश्वत होऊन गावातील पिण्याच्या पिण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटतो.
उन्हाळ्यातील पाण्यासाठी भटकंती थांबली
मेनखत या आदिवासीबहुल गावाची लोकसंख्या साधारणत: ३०० असून या संपूर्ण लोकवस्तीला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. जुवाडी व खैरी व दोन गावांतील सुमारे दोन हजार लोकवस्तीलाही पिण्याचे पाणी पुरविण्याचा प्रश्न होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत स्त्रोत बळकटीकरण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी १२ लाख रुपये खर्च आला असून आज तीनही गावांना मुबलक पाणी पुरवठा होत आहे.
मेनखत येथील सावित्रीबाई विनोद सयाम म्हणाल्या की, पूर्वी उन्हाळ्यात तीन ते चार किमी अंतरावरून पाणी आणावे लागत होते; पण भूजल सर्वेक्षण यंत्रणेने वर्धा पॅटर्ननुसार राबविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमामुळे गावातच उन्हाळ्यातही भरपूर पाणी मिळत असल्याचे सांगितले.