शेतकऱ्यांसाठी वर्धा-नागपूर जाम
By Admin | Updated: December 10, 2014 23:01 IST2014-12-10T23:01:38+5:302014-12-10T23:01:38+5:30
शेतमालाला भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक्स्प्रेस वे वर दत्तपूर चौकात बुधवारी (दि़१०) रस्ता रोको आंदोलन केले़ सुमारे एक तास रस्ता रोखून

शेतकऱ्यांसाठी वर्धा-नागपूर जाम
रायुकाँचा रास्तारोको : शेकडो कार्यकर्त्यांनी रोखला रस्ता, बराचकाळ वाहतुकीचा खोळंबा
वर्धा : शेतमालाला भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक्स्प्रेस वे वर दत्तपूर चौकात बुधवारी (दि़१०) रस्ता रोको आंदोलन केले़ सुमारे एक तास रस्ता रोखून धरण्यात आला़ अधिकारी आंदोलनस्थळी येऊन दखल घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली़ यामुळे नायब तहसीलदार प्रीती डुडूरकर यांनी भेट देत निवेदन स्वीकारले़ यानंतर प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष समीर देशमुख, जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांनी रस्ता मोकळा करून दिला़
सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना खर्चावर आधारित आणखी ५० टक्के भाव वाढवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण भाव वाढवून देणे सोडून असलेल्या भावाच्या ५० टक्के कमी भाव देण्यात येत आहे. कापसाला केवळ ४ हजार ५० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह सोयाबीन, ऊस व दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडले़ विदर्भासह राज्यातील शेतकरी नापिकी व कर्जाने त्रस्त होऊन आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांची विदारक स्थिती असताना शासन आपल्याच धुंदीत आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, यासाठी १० दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतर्फे समीर देशमुख यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले होते़ यात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता; पण निवेदनानंतरही शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांची एकही मागणी शासनाने पूर्ण केली नाही़ याचा निषेध म्हणून बुधवारी रायुकाँने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी रायुकाँ प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी विदर्भ व मराठवाडा दुष्काळाच्या गर्तेत असताना शासन मंत्रीमंडळ विस्तारात गुंतले आहे. दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे; पण शासनाला याचे कसलेही सोयरसुतक नाही़ निगरगट्ट शासनाला जाग यावी, यासाठी संपूर्ण राज्यभर युवक आघाडी विविध आंदोलने करीत असल्याचे सांगितले़ समीर देशमुख यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा पाढा वाचला़ सोयाबीन व ऊस उत्पादकांच्या मागण्या शासनाने त्वरित सोडवाव्या, शेतकऱ्यांना एकरी अनुदान द्यावे, अशी मागणीहीे त्यांनी केली़
रस्तारोको आंदोलनात नगरसेवक सुरेश ठाकरे, मुन्ना झाडे, किसान सेल जिल्हाध्यक्ष संजय काकडे, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष प्रा. खलील खतीब, मधुकर टोणपे, सुनील भोगे, वसंत वडतकर, बबला लालवाणी, किरण उपाधे, अजीत ठाकरे, आर्वी जिल्हाध्यक्ष संदीप काळे, सेलू तालुकाध्यक्ष अर्चित निघडे, राविकाँ जिल्हाध्यक्ष राहुल घोडे, महावीर तिवारी, शुभम झाडे, संदीप भगत, चांद खा पठाण, संदीप धुडे, हाफीज पठाण, उत्कर्ष देशमुख, अजय गौळकर, निहाल देशमुख, अमोल भोगे, अतुल वघळे, अजय जानवे, अमीत लुंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांच्या मागण्या रेटून धरल्या़(कार्यालय प्रतिनिधी)