लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडल, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल ८८.८६ टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत टक्का चांगलाच घसरला.
गेल्यावर्षी ९२.०२ टक्के निकाल लागला होता. असे असले तरीही जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान आर्वीनेच यंदाही कायम राखला आहे. आर्वीच्या कृषक इंग्लिश विद्यालयाची अनुष्का लक्ष्मीकांत जिरापुरे हिने ९९.६० टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच पुलगाव येथील सेंट जॉन हायस्कूलची दिशा दिलीप वर्मा ही ९८.८० टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय तर आर्वीच्या विद्यानिकेतन इंग्लिश शाळेची निधी अविनाश जयसिंगपुरे ही ९८.२० टक्के गुण घेऊन तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. यावर्षी जिल्ह्यातून १५ हजार ६४४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १५ हजार ५२३ विद्यार्थ्यांनीपरीक्षा दिली असून १३ हजार ७९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या वर्षीही दहावीच्या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारून निकालातील आपले वर्चस्व कायम राखले. आवर्तीने सलग दुसन्य वर्षीही जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पालकांसह शिक्षक वृंद आणि आप्तस्वकीयांकडून कौतुक होत आहे.
अनुष्काला अभियंता व्हायचंयजिल्ह्यातून प्रथम आलेल्या अनुष्का जिरापुरे हिला अभियंता व्हायचे असल्याचे तिने सांगितले. अनुष्का ही कृषक इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी असून तिचे वडील नोकरीवर असून आई शिलाईकाम करतात. तीची मोठी बहिण बीएएमएसच्या पहिला वर्षाला आहे. दररोज सहा ते सात तास अभ्यास करुन तिने हे यश मिळविले. तीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय तसेच मुख्याध्यापिका प्रणिता हिवसे, विजय डोळस यांच्यासह शिक्षकांना दिले आहे.
निधी म्हणाली मला अभियंता व्हायचंय....जिल्ह्यातून तृतीय आलेली आर्वीच्या विद्यानिकेतनची विद्यार्थिनी निधी जयसिंगपुरे हिला अभियंता व्हायचे असून तिने आतापासूनच जेईईचे वर्ग लावले आहे. दहावीत तिने इंग्रजी, गणित व विज्ञानाची शिकवणी लावून अभ्यासात सातत्य कायम राखले. निधीचे वडील हॉटेल व्यावसायिक असून आई शिक्षिका आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच प्राचार्य नितीन वडणारे, मुख्याध्यापिका नीलिमा पातुर्डे व सर्व शिक्षकांना दिले.
दिशा वकील होणारजिल्ह्यातून दुसरी आलेली दिशा वर्मा ही पुलगावच्या सेंट जॉन हायस्कूलची विद्यार्थिनी असून, तिने वकील होण्याचा मानस केला आहे. दिशाचे वडीलही वकील असून आई गृहिणी आहे. संयुक्त कुटुंबात वाढलेल्या दिशाने यशाला गवसणी घातल्याने परिवारात आनंदाचे वातावरण आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय तसेच शाळेतील शिक्षकांना दिले आहे.