Wardha Blast; ‘त्या’ सहा कुटुंबांत उसळला आक्रोशाचा आगडोंब..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:21 IST2018-11-20T17:19:11+5:302018-11-20T17:21:37+5:30
पुलगावातील लष्करी तळाजवळच्या केळापूर, सोनेगाव या गावांसाठी मंगळवार २० नोव्हेंबरचा दिवस हा काळा दिवस म्हणूनच उजाडला होता.

Wardha Blast; ‘त्या’ सहा कुटुंबांत उसळला आक्रोशाचा आगडोंब..
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: पुलगावातील लष्करी तळाजवळच्या केळापूर, सोनेगाव या गावांसाठी मंगळवार २० नोव्हेंबरचा दिवस हा काळा दिवस म्हणूनच उजाडला होता. केळापुरातील चार तर सोनेगावमधील एक कुटुंब अक्षरश: उघड्यावर पडले आहे. या पाच कुटुंबातील कर्ते पुरुष बॉम्बब्लास्टमध्ये ठार झाले आहेत.
रोज कष्ट करून चार पैसे मिळवायचे आणि कुटुंबाचे पालनपोषण करायचे असा साधासुधा पण कष्टाचा दिनक्रम असलेल्या या कुटुंबांचा आता जीवनक्रमच बदलून गेला आहे. घरातील स्त्रियांचा हंबरडा ऐकून गावकºयांच्या काळजाचे पाणी होत आहे. तर या पाच कुटुंबांतील लहानग्या मुलांच्या निरागसतेवर अकाली अनाथपणाचा टिळा लागला आहे.
रोजंदारीच्या कामाला गेलेला घरचा कर्ता माणूस परत येत नाही आणि त्याचा छिन्नविच्छिन्न झालेला देहच परत येतो तेव्हा त्या कष्टकरी कुटुंबावर काय कोसळते हे तेच कुटुंब जाणू शकते, आपण फक्त त्याची कल्पनाच करू शकतो. यातील राहुल भोवते हा तरुण अवघ्या २३ वर्र्षांचा होता. आज संध्याकाळी या गावातून चार अंत्ययात्रा निघाल्या. तर सोनेगावातून एक. या घटनेने दोन्ही गावे सुन्न होऊन गेली आहेत.
५० किलोची एक पेटी
ज्या पेट्यांमध्ये हे बॉम्ब ठेवले होते ती एक पेटी ५० किलोची होती. या पेटीला एक माणूस डोक्यावर वा हातात धरून सुमारे १५० मीटरचे अंतर चालून जात होता. तसे करताना कुठलीही सुरक्षा योजना तेथे नव्हती.
ठेकेदाराप्रती धुमसतो आहे असंतोष
ज्या ठेकेदाराने या कामाचा ठेका घेतला होता त्याच्याप्रती गावकºयांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्याने योग्य ती खबरदारी घेतली नाही म्हणून हा अपघात घडला असा गावकºयांचा आरोप आहे. तसेच लष्करातले अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात काही साटेलोटे असल्याचेही बोलले जात आहे.