वर्धा नदी पात्राला स्वच्छता अभियानाची प्रतीक्षा
By Admin | Updated: January 20, 2015 00:11 IST2015-01-20T00:11:17+5:302015-01-20T00:11:17+5:30
महात्मा गांधी स्वच्छता मिशन अंतर्गत गंगा, यमुना आदी मोठ्या नद्या प्रदूषणमुक्त करण्याची मोहीम सुरू आहे; पण शहरालगत बारमाही वाहणारी वर्धा नदी कित्येक वर्षांपासून काठावर वाढलेली बेशरम,

वर्धा नदी पात्राला स्वच्छता अभियानाची प्रतीक्षा
बेशरम, निर्माल्यामुळे नदीला प्रदूषणाचा विळखा
प्रभाकर शहाकार - पुलगाव
महात्मा गांधी स्वच्छता मिशन अंतर्गत गंगा, यमुना आदी मोठ्या नद्या प्रदूषणमुक्त करण्याची मोहीम सुरू आहे; पण शहरालगत बारमाही वाहणारी वर्धा नदी कित्येक वर्षांपासून काठावर वाढलेली बेशरम, घाटावर साचणारी घाण, केरकचरा, निर्माल्यामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे़ वर्धा नदी पात्राला अद्यापही स्वच्छता मोहिमेची प्रतीक्षाच करावी लागत आहे़
नदीच्या पंचधारा घाटावर पौराणिक इतिहासाची साक्ष देणारे ४०० वर्षांपूर्वीचे भोसलेकालीन शिव मंदिर आहे. बारमाही वाहणाऱ्या नदीवर हरितालिका, नारळी पौर्णिमा या सणांना महिलांची गर्दी होते़ नदीचे धार्मिक व पौराणिक महत्त्व लक्षात घेता सोमवती अमावस्येला मोठी यात्रा भरत होती़ अधिक मासात भाविक दररोज पहाटे गंगास्रानाचा आनंद लुटत होते़ शहर, केंद्रीय दारूगोळा भांडार व अनेक गावांना याच नदीतून पाणी पुरवठा होत होता़ पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी वर्धा जेव्हा कोपायची, तेव्हा शहरवासी तिचा राग शांत व्हावा म्हणून पूजाअर्चा, आरती करून श्रीफळ अर्पण करीत होते़ लाखो लोकांची शेती फुलविणारी, कित्येक गावांना पाणी पुरवठा करणारी नदी शांतपणे प्रवाहित असायची; पण गत तीन दशकांत नदीवर धरण बांधण्यात आले व नदीचा प्रवाह खंडित झाला.
प्रवाहित नदी पात्रात पूर्वी घाण नव्हती; पण प्रवाह खंडित झाल्याने खडक उघडे पडले़ तीनही घाटांच्या पूढे बेशरम वाढली़ खंडित जलप्रवाहाने विसर्जित देवी-देवतांच्या मूर्ती घाण पाण्यात तशाच पडून दिसतात. नदीच्या पात्रात साचलेले डबके, उगवलेली वनस्पती, तरंगणारे निर्माल्य यामुळे नदी प्रदूषित झाली़ पंचधारा स्मशान घाटावर शवयात्रेत येणाऱ्यांना स्नानासाठी तर दूर पिण्यासाठीही पाणी राहत नाही. धरणातून पाणी सोडलेच तर चार-सहा दिवस प्रवाह सुरू असतो़ नंतर नदीचा खडकाळ अंतरंग दृष्टीस पडतो़ गुंजखेडा घाटावर एमईएस, पुलगाव, गुंजखेडा व नाचणगाव पाणी पुरवठा योजना असल्याने तेथे काही प्रमाणात पाणी अडविले; पण नदीच्या पात्रात अन्य ठिकाणी थोडे फार प्रदुषणयुक्त पाणी असते़ तत्कालीन पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळ यांनी संघटनांच्या साह्याने स्वच्छता अभियान राबवून नदीचा घाट व परिसर स्वच्छ केला होता; पण सध्या स्वच्छता अभियानाची प्रतीक्षा आहे़ शासन, प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे़
पौराणिक इतिहासाची साक्ष; तीन घाटांची निर्मिती
उत्तर-दक्षिण वाहणारी वर्धा नदी शेकडो वर्षांपासून पौराणिक इतिहासाची साक्ष देत आहे़ दक्षिणेकडे वाहत जाऊन पूढे कोटेश्वर या तीर्थक्षेत्री ती उत्तर वाहिनी होते. या नदीला ऋषिमुनीचे सान्निध्यच नव्हे तर मोठमोठे यज्ञ, पाहुण्यांचे भाग्यही लाभले आहे.
नागरिक नदीच्या पवित्र प्रवाहात स्रान करायचे. ही गरज लक्षात घेत नदीवर १९२८ मध्ये (विक्रम संवत १९८४ ज्येष्ठ शुक्ल १५) स्व. जोहारमल सोमाणी रा़ बिकानेर यांची पत्नी व सेठ शिवाजी मुंधडा यांची कन्या सीताबाई यांनी घाट बांधला़ त्यास सीता घाट संबोधले जाते़ १९३४ मध्ये (विक्रम संवत १९९१ वैशाख शुक्ल १०) स्व. गंगादिन केसरवाणी जन्म बदलपूर प्रयागराज यांनी दुसरा घाट बांधला तर जमीनदास मदनमोहन केला रा़ जैसलमेर राजस्थान यांनी ९ मे १९३५ (विक्रम संवत १९९२ वैशाख शुक्ल ३) मदनमोहन घाटाचे बांधकाम करून स्नानाची सोय केली़