सिमेंट बांधांना मंजुरीची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 3, 2015 01:46 IST2015-05-03T01:46:45+5:302015-05-03T01:46:45+5:30
तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट नाला बांध बांधण्यात येणार आहे़

सिमेंट बांधांना मंजुरीची प्रतीक्षा
कारंजा (घा़) : तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट नाला बांध बांधण्यात येणार आहे़ यामुळे शेतकऱ्यांना पाणीटंचाईवर मात करता येईल़ यासाठी अनेक ठिकाणी नाला खोलिकरणाची कामे करण्यात आली आहेत; पण अद्यापही सिमेंट नाला बांधकामाला सुरूवात झाली नाही़ यामुळे शिवार खरोखरच जलयुक्त होणार की शेतीच जलयुक्त होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ अद्यापही सिमेंट बंधाऱ्यांना मंजुरीची प्रतीक्षा असल्याने जलयुक्त शिवारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाल्यांचे खोलीकरण करण्यात येत आहे; पण अद्याप सिमेंट बंधाऱ्यांना मंजुरी देण्यात आलेली नाही़ सिमेंट बांध नसल्याने रुंदीकरणाची कामे झालेल्या नाल्यांमुळे शेती तर जलयुक्त होणार नाही ना, अशी शंका शेतकरी उपस्थित करीत आहे़ यासाठी सिमेंट बांध तातडीने होणे गरजेचे आहे. तांत्रिक मंजुरी न मिळाल्याने तसेच अंदाजपत्रक तयार न झाल्याने बरीच सिमेंट बांधाची कामे रखडली आहेत़ नाला खोलीकरण झाल्याने व त्या नाल्यावर सिमेंट बांध तयार होत असल्याने शिवारात शेतकऱ्यांना शेती सिंचनाची सोय होणार आहे़ शिवाय यामुळे भोवतालच्या विहिरींची पाणी पातळी वाढण्यासही मदत होणार आहे़ कोरडवाहु शेतकऱ्यांना या पाण्याचा सिंचनाकरिता लाभ होण्याचीही शक्यता आहे; पण केवळ खोलीकरण झाले, सिमेंट बांध बांधले नाही़ पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपला आहे, अशा स्थितीत नाल्याच्या सभोवताल शेतात नाल्याचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे़ याकडे लक्ष देत बंधारे पूर्ण करणे गरजेचे झाले आहे़(शहर प्रतिनिधी)
नाल्यांचे खोलीकरण शेतांसाठी ठरणार धोकादायक
तालुक्यात अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला सरळीकरण तसेच खोलीकरणाची कामे करण्यात आली आहेत़ या नाल्यांवर सिमेंट बांध बांधण्यात येणार असून यामुळे जलसंकट दूर सारले जाणे अपेक्षित आहे; पण यातील बंधाऱ्यांना अद्यापही मंजुरी प्राप्त झाली नाही़ केवळ नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले असून एक महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे़ यामुळे खोलीकरण केलेले परिसरातील नाले शेतांसाठीच धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत सिमेंट बंधाऱ्यांची कामे त्वरित हाती घेणे गरजेचे झाले आहे़ अन्यथा शिवाराऐवजी शेतीच जलयुक्त होण्याची भीती आहे़