वाई नाल्याला आला पूर; गावाचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST2021-09-17T05:00:00+5:302021-09-17T05:00:34+5:30
दुपारच्या सुमारास घरून कामासाठी बाहेर गावी गेलेले नागरिक तसेच शाळेत गेलेले विद्यार्थी पुलावरून पाणी वाहत असल्याने जागीच अडकून पडले आहेत. तसेच गावातील नागरिकांना गावाबाहेरदेखील जाता येत नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शाळेत गेलेली मुलगी घरी कधी येणार, असा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत आहे. नाल्यावरील पूल फारच ठेंगणा असल्याने पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली येतो. यामुळे वाहतूक ठप्प होते.

वाई नाल्याला आला पूर; गावाचा संपर्क तुटला
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : सततच्या पावसामुळे सालदरा तलावातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गाने वाई येथील नाल्याला पूर आला आहे. परिणामी, पुलापलीकडील गावाचा संपर्क तुटला असून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
दुपारच्या सुमारास घरून कामासाठी बाहेर गावी गेलेले नागरिक तसेच शाळेत गेलेले विद्यार्थी पुलावरून पाणी वाहत असल्याने जागीच अडकून पडले आहेत. तसेच गावातील नागरिकांना गावाबाहेरदेखील जाता येत नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शाळेत गेलेली मुलगी घरी कधी येणार, असा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत आहे. नाल्यावरील पूल फारच ठेंगणा असल्याने पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली येतो. यामुळे वाहतूक ठप्प होते. परिणामी पूर ओसरत पर्यंत प्रतिक्षा करावी लागते.
५ वर्षांपूर्वी वसंत पुनवाटकर हा नागरिक याचपुलाला आलेल्या पुरात वाहून गेला असून त्याला जीव गमवावा लागला होता.
तेव्हापासून पुलाची उंची वाढविण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, शासन व लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून कुणीही या गंभीर समस्येची दखल घेण्यात धन्यता मानली नाही. अखेर यंदाच्या पावसाळ्यातही सततच्या पावसाने पुलावरील वाहतूक ठप्प झाली असून गावाचा संपर्क तुटल्याने पूल उंच करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
माजी सरपंचांचा ठिय्या
नागरिक पुलावरून जाण्याचा प्रयत्न करतात, अशा वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी पाण्यातून पूल ओलांडू नये, यासाठी माजी सरपंच गणेश गचकेश्वर, पोलीस पाटील, कोतवाल आदींसह काही नागरिक नाल्याच्या बाजूला ठिय्या मांडून बसले असून नागरिकांना आवागमन करण्यास मज्जाव करीत असल्याचे दिसून येत आहे.